आशिया कप हॉकी – हिंदुस्थानचा दमदार विजयारंभ, कर्णधार हरमनप्रीत सिंहची हॅटट्रिक; चीनवर 4-3 ने मात

‘आशिया हॉकी कप 2025’ स्पर्धेत हिंदुस्थानी हॉकी संघाने विजयी सलामी देत दमदार सुरुवात केली. थरारक पहिल्या सामन्यात हिंदुस्थानने चीनचा 4-3 असा पराभव करत विजयारंभ केला. कर्णधार हरमनप्रीत सिंहच्या अप्रतिम हॅटट्रिक गोलांमुळे हा सामना हिंदुस्थानच्या झोळीत गेला.

सामन्याच्या सुरुवातीला चीनने आक्रमक खेळ दाखवत 12व्या मिनिटाला गोल केला आणि हिंदुस्थानवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, मात्र हिंदुस्थानकडून जुगराज सिंहने 18व्या मिनिटाला गोल करत बरोबरी साधली. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत सिंहने जबाबदारी घेतली आणि 20व्या तसेच 33व्या मिनिटाला सलग दोन गोल करत हिंदुस्थानला 3-1 अशी आघाडी मिळवून दिली.

चीनने झुंजार खेळ करत चेन बेनहाईच्या 35व्या आणि गाओ जिशेंगच्या 41व्या मिनिटाला प्रत्येकी एक गोल नोंदवला आणि सामना 3-3 अशी रंगतदार स्थिती निर्माण झाली. सामना बरोबरीत सुटणार असे वाटत असतानाच पुन्हा हरमनप्रीत सिंहने आपल्या जादुई खेळाची छाप सोडली. 47व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवरून साधलेला त्याचा अचूक प्रहार थेट गोलमध्ये बदलला आणि हिंदुस्थानने 4-3 अशी निर्णायक आघाडी घेतली. अखेर हाच गोल विजयी ठरला.

पुढील सामने अधिक रोमांचक ठरणार

या सामन्यात हरमनप्रीत सिंहने तीन गोल करून हॅटट्रिक पूर्ण केली. पहिला गोल त्याने 20व्या मिनिटाला, दुसरा 33व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवरून आणि तिसरा व निर्णायक गोल 47व्या मिनिटाला साधला. त्याच्या या विजयी खेळीमुळेच हिंदुस्थानला विजय मिळवणे शक्य झाले. आता हिंदुस्थानचा पुढचा सामना 31 ऑगस्ट रोजी जपानशी होणार आहे. चीन, कझाकिस्तान आणि जपान या संघांसह हिंदुस्थान एकाच गटात असून, स्पर्धेतील पुढील सामने अधिक रोमांचक ठरण्याची शक्यता आहे.