
>>जे. डी. पराडकर
नोकरी-व्यवसायानिमित्त दूरवर असणारी कोकणातील मंडळी वर्षातून एकदा ग्रामदेवतेच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आपल्या गावी येतात तो सण म्हणजेच शिमगोत्सव. फाल्गुन पंचमीपासून सलग दहा दिवस संपन्न होणाऱया या सणाला ग्रामदेवतेचा खेळ असेही म्हटले जाते. होळी, पालखी, नमन या सर्वांचा एकत्रित जागर करताना भक्तगण देहभान विसरून जातो.
शिमगोत्सवात भक्तगण देहभान विसरून ग्रामदेवतेपुढे आपली सेवा रुजू करतात. वर्षभरातील अन्य सणांना ग्रामदेवता मंदिरात येणं शक्य झालं नाही तरी शिमगोत्सवाला सर्व अडचणी बाजूला करून भक्त आपल्या गावी हजेरी लावतो. सर्वांच्या मनामध्ये नवचैतन्य निर्माण करणारा सण म्हणूनही या सणाकडे पाहता येईल. आपल्या वर्षभराच्या वाटचालीची भिस्त ग्रामदेवतेवर नवस आणि सालाबादच्या रखवालीतून टाकल्यानंतर भक्तगण काहीसे चिंतामुक्त होतात. मनातील चिंतेची वादळं दूर झाली की, सकारात्मक विचारांच्या जोडीने यश मिळत जाते आणि ग्रामदेवतेसह नोकरी-व्यवसाय तसेच मेहनतीवरील श्रद्धा अधिक कणखर बनते.
फाल्गुन पंचमीला होळी सणाला प्रारंभ होतो. गावातील तरुण मुलं सायंकाळच्या वेळी ठराविक ठिकाणी जमून वाजत-गाजत होळीसाठी आवश्यक साहित्य जमा करतात. होळी उभी राहिली की, ती प्रज्वलित करण्यासाठी रात्री सर्व मंडळी परत एकत्र येतात. या वेळी ग्रामदेवतेचा जयजयकार करत या हंगामातील आटय़ापाटय़ा हा खेळ खेळला जातो. होळी सणाच्या दरम्यान छोटय़ा-छोटय़ा चोऱया करणे हा अपराध समजला जात नाही. नारळ, पावटय़ाच्या शेंगा आणि कलिंगड गोळा करून होळीच्या ठिकाणीच त्याचे वाटप केले जाते. अशा पदार्थांचा एकत्रित आस्वाद घेतल्यानंतरच होळी प्रज्वलित करतात. होळी पौर्णिमेपर्यंत दररोज अशा मेजवान्या तर मिळतातच, पण जोडीला खेळांमधून व्यायामही होत असल्याने तरुणांच्या मनात कमालीचा उत्साह असतो.
ग्रामदेवतेच्या या खेळातील प्रथा, परंपरा गावागावांतून जरी भिन्न स्वरूपाच्या असल्या तरी उद्देश मात्र भक्तीच्या आनंदमयी प्रवासात एकरूप होणे हाच असतो. मंदिरात असणाऱया मूर्तींना चांदीचे मुखवटे लावून सजवण्याच्या पद्धतीला ‘रूपं लावणं’ म्हणतात. पालखीमध्ये ठेवल्या जाणाऱया मूर्तीही चांदीच्याच असतात. त्रयोदशीला संपन्न होणाऱया शिमग्यांना तेरसे, पौर्णिमेनंतर संपन्न होणाऱया शिमग्यांना भद्रेचे, अशी ग्रामीण नावे दिली गेली आहेत. होळय़ा प्रज्वलित करण्यापूर्वी माड उभा करण्याच्या पद्धती आहेत. यामध्ये सूरमाड किंवा आंबा यांचा वापर केला जातो. तोडलेल्या ठिकाणापासून तो ढोल-ताशांच्या गजरात नाचवत आणून होळीच्या ठिकाणी उभा राहिल्यानंतरच होळी संपन्न होते. शिमगोत्सवाच्या दिवशी गावागावांतून यात्रा भरते. ठिकठिकाणचे विव्रेते व्यापारासाठी दाखल होतात. या दिवशी प्रत्येक जण मनसोक्त पालखी नाचवतो आणि ढोलवादनाचा आनंदही लुटतो. एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पालखी प्रत्येक भक्तगणाच्या घरी नेली जाते. वर्षभरात एक दिवस प्रत्यक्ष ग्रामदेवता घरी येण्याचा दिवस भक्तासाठी आनंददायी असतो.
काही गावांतून पालख्यांच्या भेटीचा सोहळा संपन्न होतो. दोन गावांतील ग्रामदेवतांच्या भेटीचा हा अनोखा सोहळा पाहण्यासाठी हजारो भक्तगण गर्दी करतात. कोकणातील काही भागांत लपवलेल्या खुणा पालख्या शोधून काढतात. ज्या ठिकाणी जमिनीत नारळ पुरून ठेवलेले असतात त्या ठिकाणी पालखी अक्षरशः ओढत घेऊन जाते आणि खुणेजवळ पालखीचा खूर आपटतो. हा सोहळा पाहण्यासाठी आजूबाजूच्या अनेक गावांतून भक्तगण दाखल होतात. ग्रामदेवतेची ताकद या वेळी सर्वांना ‘याचि देही याचि डोळा’ दिसून येते. अखेरच्या दिवशी रंगांची उधळण करीत रात्रभर पालखी नाचवून रूपं उतरवली जातात. यालाच देव ‘राजांगणी जाणे’ अथवा ‘शिंपणे’ असे म्हटले जाते. ग्रामदेवतेसमोर ‘नमन’ या सांस्कृतिक कलेचे सादरीकरण झाल्यावर शिमगोत्सवाची सांगता होते. मोठय़ा आर्थिक उलाढालीसह सर्वांना एकत्र आणणारा तसेच भक्तिमय वातावरणात साजरा होणारा ग्रामदेवतेचा खेळ यासाठीच महाराष्ट्रात लोकप्रिय आहे.



























































