
सामना ऑनलाईन, मुंबई
शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर करण्यास नकार दिला. तावडे यांच्या मते मुंबईत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिलेला नव्हता, त्यामुळे आपण हा निर्णय घेत असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र त्यांना हा निर्णय जाहीर करण्यापूर्वीच बहुतांश शाळांनी विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेता सुट्टी जाहीर केली होती. काही शाळांनी पालकांना फोनवरून तर काहींनी मेसेज पाठवून सुट्टी असल्याचं कळवलं.
शिक्षणमंत्री नागपुरात बोलत असताना इकडे मुंबईत मुसळधार पाऊस पडत होता. मुंबईतील जनतेला हवामान खात्यावर फारसा विश्वास नाही, कारण बहुतांश वेळा त्यांनी दिलेले इशारे हमखास चुकतात. पावसाचं रौद्ररूप पाहिल्यानंतर पालकांनी सकाळपासूनच शाळा चालू आहे की नाही हे विचारण्यासाठी शाळांमध्ये फोन करायला सुरूवात केली होती. अनेकांनी आपल्या पाल्यांना न पाठवण्याचा निर्णय घेतला होता. विधानसभेत शाळांना सुट्ट्या का दिल्या नाहीत असा प्रश्न उपस्थित झाला. तावडे अडचणीत सापडणार हे दिसताच मुख्यमंत्री त्यांच्या मदतीला धावले त्यांनी मुंबईत अतिवृष्टी झाल्याचं मान्य केलं आणि शिक्षण मंत्र्य़ांना संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून सुट्टीबाबत निर्णय घेण्यास सांगितलं. ज्यानंतर विनात तावडे यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर येत मुख्याध्यापकांनी सुट्टी देण्याबाबत निर्णय घ्यावा असे निर्देश दिले. त्यांनी हे निर्देश देण्यापूर्वीच अनेक शाळांच्या मुख्याध्यापकांनी सुट्ट्या देऊन टाकल्या होत्या
























































