होळीपूर्वीचे आठ दिवस अशुभ का मानले जातात? जाणून घ्या शिवमहापुराणातील कथा…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> योगेश जोशी

होळीचा सण पुढील आठवड्यात होत आहे. मात्र, होळीपूर्वीचे आठ दिवस अभुभ मानले जातात. त्याला आपल्या शास्त्रात होलिका अष्टक किंवा होलाष्टक असे म्हणतात. या काळात कोणतीही शुभकार्य करण्यात येत नाहीत. उत्तर हिंदुस्थानात याला खरमास असे म्हणतात. तिथे होळीपूर्वी 15 दिवस कोणतीही शुभकार्ये करण्यात येत नाहीत. या अशुभ काळाची कथा भक्त प्रल्हाद आणि शिवमहापुराणाशी संबंधित आहे. आता याबाबतची शिवमहापुराणातील कथा जाणून घेऊ या.

आपल्या संस्कृतीत होलिका अष्टक अशुभ मानले जाते. या काळात कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई आहे. होलाष्टकाच्या काळात शुभ कार्य केल्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, अशी मान्यता आहे. तसेच होलाष्टक दरम्यान कोणतेही शुभ कार्य केल्यास अनेक अडथळे येतात. फाल्गुन मासातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीपासून होलिका अष्टक सुरू होते. यंदा 24 फेब्रुवारीपासून होलाष्टक सुरू होत असून ते होळीच्या दिवशी 3 मार्च रोजी संपणार आहे.

होळीपूर्वी होलिका अष्टकचा आठ दिवसांचा काळ, ज्या दरम्यान शुभ कार्ये निषिद्ध असतात, तो अशुभ काळ सुरू होतो. याचे कारण शिवपुराणातील कथेत देण्यात आले आहे. शिवमहापुराणातील कथेनुसार, तारकासुर या राक्षसाला वरदान होते की तो फक्त शिवाच्या पुत्रानेच मारला जाईल. दक्षाच्या यज्ञात सती जळून गेल्यानंतर, शिव गहन समाधीत मग्न झाल्याने शिवपुत्राचा जन्म कसा होणार, असा प्रश्न देवतांना पडला होता. मात्र, काही काळाने महादेवाने देवी पार्वतीशी लग्न केले. देवी पार्वतीशी लग्न केल्यानंतर महादेव पुन्हा एकदा समाधी अवस्थेत गेले. त्यामुळे देव निराश झाले. त्यानंतर त्यांनी कामदेवाला वसंत ऋतूबाण घेऊन देवी रतीसोबत संमोहन नृत्य करण्यासाठी पाठवले, त्याद्वारे महादेव समाधी अवस्थेतून जागृत होतील.

कामदेवाने वसंत ऋतूतील अनेक बाण सोडले. मात्र, त्याचा महादेवांवर काहीही परिणाम झाला नाही. अखेर कामदेवाने एक बाण महादेवाच्या तिसऱ्या डोळ्यावर सोडला. त्यामुळे महादेवांनी त्यांचा तिसरा डोळा उघडला आणि त्यातून निघणाऱ्या ज्वाळांनी कामदेव लगेच भस्म झाला. अशी मान्यता आहे की, कामदेवाने सलग आठ दिवस महादेवाचे ध्यान भंग करण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच, हे आठ दिवस अशुभ मानले जातात.

या कथेत पुढे असे म्हटले आहे की, सृष्टीचा समतोल राखण्यासाठी शिवाने कामदेवाला पुनरुज्जीवित केले, त्याला मोक्ष आणि संरक्षण दिले. मात्र, त्यावेळी त्याला शरीर नव्हते. तो फक्त आत्मारुपात त्याचे कार्य करत होता. त्यामुळे कामदेवाला अनंग असे नाव पडले. काही काळानंतर शिवाला कळले की कामदेवाचा हेतू चुकीचा नव्हता आणि तो फक्त धर्म स्थापित करण्यासाठी आणि शिवाला त्याच्या समाधीतून जागृत करण्यासाठी प्रयत्नशील होता. कामदेवाचा सन्मान करण्यासाठी, शिवाने त्याची राख स्वतःवर लावली. अशा प्रकारे, शिव चितेची राख लावणारा योगी बनला. कामदेवाचे दहन हे जगातील प्रेमाचे दहन होते, म्हणूनच होळीच्या आधीचे आठ दिवस अशुभ मानले जातात, अशी कथा होलिका अष्टकमागे आहे.