
2027 मध्ये केली जाणारी जनगणना ही पूर्णपणे डिजिटल पद्धतीने केली जाणार आहे. याच्या देखरेखीसाठी एक सीएमएमएस नावाचे डिजिटल पोर्टल असणार आहे, अशी माहिती देशाचे रजिस्ट्रार जनरल मृत्युंजय कुमार नारायण यांनी मुख्य सचिवांना पाठवलेल्या परिपत्रकात दिली आहे. आगामी जनगणनेत, डेटा डिजिटल पद्धतीने गोळा केला जाणार आहे. डेटा संकलनासाठी किमान 3.2 दशलक्ष फील्ड कर्मचारी तैनात केले जातील. पहिल्या टप्प्यात राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांच्या सोयीनुसार एप्रिल ते सप्टेंबर 2026 या 30 दिवसांच्या कालावधीत घरांची यादी आणि गृहसंख्या गणना यांचा समावेश असेल.
एका तासात अडीच लाख रोपांची लागवड
वाराणसीमध्ये वृक्षारोपणाचा रेकॉर्ड झाला आहे. सुजाबाद-डोमरी येथे एका तासात 2 लाख 45 हजार 103 रोपं लावून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात आला. याआधी चीनने 2018 साली एका तासात 1,53,981 रोपे लावून विक्रम केला होता. डोगरी गावात आधुनिक शहरी वन परियोजना राबविण्यात येत आहे. याअंतर्गत 350 बिघा एकर जमिनीवर मियावाकी तंत्रज्ञानाने रोपांची लागवड करण्यात आली.
फटाका फॅक्टरीतील स्फोटात 21 जणांचा मृत्यू
आंध्र प्रदेशातील काकीनाडा जिह्यातील वेत्लापलेम गावात असलेल्या एका फटाक्याच्या कारखान्यात शनिवारी भीषण स्फोट झाला. या स्फोटात 21 जणांचा मृत्यू झाला असून अद्याप नऊ जण गंभीर जखमी आहेत. या दुर्घटनेप्रकरणी चार सरकारी अधिकाऱयांना निलंबित करण्यात आले आहे. दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 20 लाखांची नुकसान भरपाई देण्याची घोषणा सरकारने केली आहे.
























































