
महाबळेश्वर म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर उभी राहते ती येथील मातीत पिकणारी लाल चुटूक स्ट्रॉबेरी. आजही महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला बाजारात मोठी मागणी आहे. आता ही स्ट्रॉबेरी ग्राहकांना पोस्टाच्या माध्यमातून घरपोच मिळणार आहे. स्ट्रॉबेरीच्या वाहतुकीसाठी डाक विभागाच्या वतीने विशेष स्पेशल कव्हर तयार केले असून, याचे प्रकाशन आज करण्यात आले.
पाचगणी येथील बहाई ऍकॅडमी येथे विशेष समारंभात महाबळेश्वर स्ट्रॉबेरीच्या स्पेशल कव्हरचे प्रकाशन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुणे विभागाच्या पोस्ट मास्तर जनरल मधुमिता दास, पोस्टाच्या वरिष्ठ अधीक्षक अपराजिता मृधा, एएसपी सातारा पोस्टल डिव्हीजन दिलीप सर्जेराव, महाबळेश्वर फळे, फुले सहकारी संस्थेचे चेअरमन किसनशेठ भिलारे, बहाई ऍकॅडमीचे चेअरमन लेसन अजादी, पाचगणीच्या नगराध्यक्षा लक्ष्मी कऱहाडकर, उद्योजक मयूर व्होरा, हुसेन माला, हिलरेंज हायस्कूलचे संचालक जतिन भिलारे व तेजस्विनी भिलारे, पाचगणीचे पोस्टमास्तर सचिन सावंत आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले, महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॉबेरीवर जीओग्राफिकल इंडिकेशन टॅगची (जीआय टॅग) मोहर यापूर्वीच उठली आहे. यामुळे या लाल मातीत पिकणारी स्ट्रॉबेरी खरी असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी जगभर प्रसिद्ध आहे. डाक विभागाने या स्ट्रॉबेरीच्या वाहतुकीसाठी विशेष स्पेशल कव्हर प्रकाशित केल्याने स्ट्रॉबेरीच्या लौकिकात भर पडणार आहे.
मधुमिता दास म्हणाल्या, डाक विभागाच्या अनेक योजना आहेत. आता येथील स्थानिक शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी ट्रान्स्पोर्ट करता येईल. या सुविधेचा लाभ शेतकऱ्यांनी घेऊन आपली आर्थिक उन्नती साधावी.
अपराजिता मृधा म्हणाल्या, महाबळेश्वर स्ट्रॉबेरीला जीआय टॅग मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना याचा कसा फायदा झाला हे जाणून घेतले. यातून स्ट्रॉबेरी उत्पादकांचा आणखी फायदा व्हावा, यासाठी पोस्टाच्या माध्यमातून स्पेशल कव्हर करून स्थानिक शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आला आहे. यावेळी किसन भिलारे यांनी स्ट्रॉबेरीचा इतिहास व महाबळेश्वर स्ट्रॉबेरीचे वैशिष्टय़ सांगितले. सूत्रसंचालन राजन सावंत, नीलकमल भारतद्वाज यांनी केले.



























































