
आंध्र प्रदेशातील गोदावरी जिह्यात भेसळयुक्त दूध प्यायल्याने अवघ्या 48 तासांमध्ये चार लोकांचा मृत्यू झाला आहे. यात दोघांचा रविवारी तर अन्य दोघांचा सोमवारी मृत्यू झाला. याशिवाय, 12 लोकांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10-10 लाख रुपये देण्याची घोषणा सरकारने केली आहे.
कर्नाटक हायकोर्टाने रणवीर सिंहला फटकारले
‘कांतारा’मधील एका दृश्याची नकल केल्याने अडचणीत आलेल्या रणवीर सिंहला कर्नाटक हायकोर्टाने जोरदार फटकारले. सुपरस्टार हा कायद्यापेक्षा मोठा नसतो, अशा शब्दात कोर्टाने रणवीर सिंहला फटकारले. धार्मिक भावना दुखावणे खपवून घेतले जाणार नाही, अशी तंबीही कोर्टाने रणवीर सिंहला दिली आहे. रणवीर सिंह विरोधात पोलिसांनी कोणतेही कठोर पावले उचलू नये, असे निर्देश हायकोर्टाने पोलिसांना दिले आहेत.
कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी हिंदुस्थानात येणार
कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी हे उद्या गुरुवारी हिंदुस्थान दौऱयावर येत आहेत. मार्क कार्नी हे सर्वात आधी म्हणजे गुरुवारी मुंबईत येतील. त्यानंतर ते दिल्लीला जातील. दिल्लीत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील. मार्क कार्नी यांचा विदेश दौरा हा 26 फेब्रुवारी ते 7 मार्च 2026 पर्यंत असणार आहे. या दौऱयात ते व्यापार, ऊर्जा, औद्योगिक आणि संरक्षण क्षेत्रावर फोकस करणार आहेत. मार्क कार्नी हे हिंदुस्थानातील उद्योगपतींनाही भेटणार आहेत. हिंदुस्थान दौऱयानंतर ते ऑस्ट्रेलियाच्या सिडनी आणि कॅनबराचाही दौरा करणार आहेत.
बांगलादेशात पोलिसांच्या ड्रगविरोधी मोहिमेत हिंसाचार
बांगलादेशमध्ये पोलिसांनी ड्रगविरोधी मोहिमेत हिंसाचार भडकला. या हिंसाचारात पत्रकारांसह अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. तसेच पोलीसही जखमी झाले. बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये पोलिसांकडून ड्रगविरोधी मोहीम सुरू केली होती. यादरम्यान पोलिसांनी सात ते आठ लोकांना ताब्यात घेतले. यावरून पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये चकमक उडाली. पोलिसांकडून विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आल्यानंतर हिंसाचार उफाळून आला, असा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला.



























































