वर्दीतल्या जवानांना प्रशिक्षण देणाऱ्या निदेशकांनाच गणवेश नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आशीष बनसोडे । मुंबई

राज्याचा होमगार्ड विभाग अक्षरशः अडगळीत पडला आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांच्या सोबतीला सदैव तत्पर राहणाऱया होमगार्डकडे बघायला सरकारकडे वेळच नसल्याने या विभागाची दयनीय अवस्था झाली आहे. जवान आहेत पण डय़ुटी मिळत नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार समान वेतन मानधन दिले जात नाही. इतकेच नाही तर गेल्या कित्येक महिन्यांपासून खाकीतल्या जवानांना प्रशिक्षण देणाऱया निदेशकांना गणवेश देण्यात येत नसल्याचे चित्र आहे. यामुळे होमगार्डमध्ये प्रचंड अस्वस्थतेचे वातावरण आहे.

राज्यात जवळपास 40 हजारांहून अधिक होमगार्डचे जवान आहेत. या जवानांसाठी विविध जिह्यांत प्राथमिक प्रशिक्षण शिबिरे राबविली जातात. त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी जवळपास 105 निदेशक तैनात आहेत पण खाकी वर्दीत असणाऱया जवानांना प्रशिक्षण देणाऱया निदेशकांना गेली कित्येक वर्षे गणवेशच देण्यात आलेले नाहीत. नियमानुसार निदेशकांना गणवेश पुरविणे गरजेचे आहे परंतु तरी देखील गणावेश दिला जात नाही. त्यामुळे निदेशकांना स्वखर्चाने कपडे घेऊन काम करावे लागत आहे. या आणि अशा अनेक समस्यांनी होमगार्ड विभाग बेजार झाला आहे. आजस्थितीला बऱयाच जवानांना डय़ुटीच मिळत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, होमगार्डना 365दिवस समान काम समान वेतन देण्यात यावे अशीही त्यांची मागणी आहे.

प्रधानमंत्री अपघात विमा योजना लागू करा!
राज्य शासकीय कर्मचाऱयांना राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजना सुरू करण्यात आली आहे त्याच धर्तीवर हेमगार्डसाठी देखील प्रधानमंत्री अपघात विमा योजना लागू करण्यात यावी. त्यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आला असल्याचे एका अधिकाऱयाने सांगितले.

अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या जागाच भरत नाहीत
होमगार्डमध्ये आज अधिकारी व कर्मचाऱयांच्या अनेक जागा रिक्त आहेत. त्या जागा भरण्यात याव्यात असे लेखी प्रस्ताव वेळोवेळी सरकारदरबारी देण्यात आले आहेत पण आमच्या प्रस्तावाची दखलच घेतली जात नसल्याचे तो अधिकारी म्हणाले.
z सर्वोच्च न्यायालयाने होमगार्ड स्वयंसेवकांचे मानधन किमान वेतनावर समान पद्धतीने प्रदान करण्याबाबत सर्व राज्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्याप्रमाणे आम्हाला देखील मानधन देण्यात यावे या आणि अशा आमच्या मागण्या आहेत, पण आमच्याकडे बघायला सरकारला वेळच नसल्याचा संताप होमगार्ड जवानांमधून व्यक्त होत आहे. म्हणून सरकारच्या सापत्न वागणुकीला वैतागून होमगार्डचे जवान नागपूर येथे आंदोलनाला बसले आहेत.

मुंबईमध्ये पूर्वी शहर पोलीस तसेच वाहतूक पोलिसांच्या सोबतीला होमगार्डचे जवान तैनात असायचे, परंतु आता केवळ रेल्वे स्थानकांवर आरपीएफ जवानांसोबतच होमगार्ड बघायला मिळतात. वाहतूक पोलिसांच्या जोडीला ट्रफिक वॉर्डन देण्यात आल्याने आम्हाला डय़ुटी मिळत नाही. डय़ुटीच मिळत नसल्याने बेरोजगारीची टांगती तलवार आमच्यावर असल्याचे जवानांचे म्हणणे आहे.

होमगार्ड विभागात अनेक बाबींची पूर्तता होण्याची नितांत आवश्यकता आहेत. निदेशकांना गणवेश मिळणे, जवानांना विमा योजना लागू करणे, उपलब्ध जवानांना डय़ुटी मिळावी यासाठी संबंधित विभागांना पत्रव्यवहार करण्यात आला परंतु त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद अद्याप मिळालेला नाही. आमच्या प्रस्तावांची कधी दखल घेतली जाईल त्याची आम्ही वाट पाहत आहोत.  – संजय पांडे, होमगार्ड महासमादेशक