कितीही विरोध करा, CAA मागे घेणार नाही; अमित शहा यांची घोषणा

505

नागरिकत्व सुधारणा कायद्याला देशभरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. त्यामुळे या कायद्याबाबत जनतेला योग्य ती माहिती देण्यासाठी भाजपकडून जनजागरण अभियान राबवण्यात येत आहे. या कायद्याच्या समर्थनार्थ उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक सभा घेतली. त्यात त्यांनी विरोधी पक्षांवर टीका केली आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत विरोधी पक्ष जनतेत संभ्रम निर्माण करत आहे. या मुद्द्यावरून मुस्लीम जनतेला भडकवण्याचा प्रयत्न करून देशात फूट पाडण्याचे राजकारण सुरू आहे, असा आरोप शहा यांनी केला. त्यासाठीच जनतेला या कायद्याबाबत योग्य ती माहिती देण्यासाठी भाजपने जनजागरण अभियान सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी अनेक केंद्रीयमंत्री आणि भाजपनेते ठिकठिकाणी सभा घेत आहेत.

कश्मीरमधून लाखो कश्मीरी पंडितांना बाहेर काढण्यात आले. त्यावेळी विरोधी पक्ष मानवाधिकारांबाबत का बोलत नव्हते, असा सवालही त्यांनी केला. विरोधी पक्षांनी कितीही विरोध केला तरी हा कायदा मागे घेण्यात येणार नाही, असे शहा यांनी सांगितले. संसदेत आमच्या पक्षाने हे विधेयक आणले तेव्हा, राहुल बाबा कंपनी विरोध करत होती. या कायद्याने देशातील मुस्लीमांचे नागरिकत्व रद्द होणार असल्याचा अपप्रचार करण्यात येत आहे. मात्र, या कायद्याने देशातील कोणत्याही नागरिकाचे नागरिकत्व रद्द होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विरोधी पक्षांनी यावर खुल्या चर्चेला समोर यावे, असे आव्हानही शहा यांनी दिले.

काँग्रेस पक्षामुळे धर्माच्या आधारावर देशाचे दोन तुकडे झाले, हे राहुलबाबांनी समजून घ्यावे, असे सांगत शहा यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमध्ये अल्पसंख्याकांवर अत्याचार होत आहे, त्यांची संख्या कमी होत आहे. त्याबाबत विरोधी पक्ष सवाल का करत नाही, असेही शहा यांनी विचारले. यावेळी त्यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावरही टीका केली. अखिलेश बाबू कोणीही सांगितलेली दोन चार वाक्ये सभेत बोलू नका, तुम्हांला याबाबत काही माहिती असेल तर चर्चेला या. या कायद्याबाबतचा अभ्यास करा. अभ्यासाने फायदा होतो, असा टोलाही शहा यांनी अखिलेश यादव यांना लगावला. दलित बंगाली लोकांना नागरिकत्व मिळत आहे, त्यात ममता बॅनर्जी यांना काय अडचण आहे, असा सवालही शहा यांनी केला. देशहिताच्या कोणत्याही गोष्टीला विरोध करण्याचे विरोधी पक्षांचे धोरण असल्याचा आरोपही शहा यांनी केला. याआधीही कर्नाटकातील हुबळीमध्ये सीएएच्या समर्थनार्थ सभा घेऊन शहा यांनी विरोधी पक्षांवर निशाणा साधला होता.

आपली प्रतिक्रिया द्या