CAAमुळे देशातील एकाही मुस्लीमाचे नागरिकत्व रद्द होणार नाही – अमित शहा

2055

नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे (सीएए) देशातील एकाही मुस्लीमाचे किंवा अल्पसंख्याकाचे नागरिकत्वाचे अधिकार रद्द होणार नाही, याचा पुनरुच्चार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी केला. ओदिशातील भुवनेश्वरमध्ये ते एका सभेत बोलत होते. सीएए हा नागरिकत्व देण्यासाठीचा कायदा आहे, या कायद्यामुळे कोणाचेही नागरिकत्व किंवा कोणतेही अधिकार रद्द होणार नाही, असे शहा यांनी स्पष्ट केले. यावेळी सीएएच्या मुद्द्यावरून त्यांनी विरोधकांवरही टीका केली.

काँग्रेस, ममतादिदी, सपा आणि बसपा हे पक्ष सीएएबाबत चुकीची माहिती जनतेत पसरवत आहेत. या कायद्यामुळे देशातील अल्पसंख्यांकांच्या अधिकारांवर गदा येईल, त्यांचे नागरिकत्व रद्द होईल, असा खोटा प्रचार विरोधक करत आहेत. विरोधक एवढा खोटा प्रचार का करत आहेत, असा सवालही त्यांनी केला. आपण आज पुन्हा स्पष्ट करत आहोत की या कायद्यामुळे देशातील एकाही मुस्लीमाचे किंवा अल्पसंख्यांकाचे नागरिकत्व रद्द होणार नाही, असे शहा यांनी स्पष्ट केले. हा कायदा नागरिकत्व देण्यासाठी आहे, हे जनतेने समजून घ्यावे, असेही ते म्हणाले. या आधीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी या कायद्यामुळे कोणाचेही नागरिकत्व रद्द होणार नसल्याचे स्पष्ट केले होते.

आपण अनेकदा ओदिशामध्ये आलो आहोत. ओदिशा आपल्याला गुजरातप्रमाणेच आहे. हे आपल्याला दुसरे घरच वाटते, असे ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीनंतर आपण पहिल्यांदाच ओदिशात आलो आहोत. लोकसभा निवडणुकीत जनतेने दिलेल्या प्रतिसादाबाबत त्यांनी जनतेचे आभार व्यक्त केले. आता ओदिशात भाजप प्रमुख विरोधी पक्ष असून जनतेचा आवाज आम्ही राज्य सरकारपर्यंत पोहचवत असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र सरकार ओदिशाच्या विकासाकडे विशेष लक्ष देत असल्याचेही त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या