
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस स्वतःचे दुकान बंद होऊ नये म्हणूनच सरकारवर टीका करतात. सरकारने कितीही चांगले काम केले तरी त्यांच्याकडून टीका केली जाते. सरकारवर टीका नाही केली तर विरोधकांचे ‘दुकान’ बंद होईल, असा टोला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लगावला आहे.
तसेच, भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणात संभाजी भिडे गुरुजी आणि समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यावर दोषारोपपत्र दाखल करण्यात यावे, असा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी येरवडा कारागृहाला भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी कारागृह विभागाचे प्रमुख अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनील रामानंद, उपमहानिरीक्षक योगेश देसाई, शरद खटावकर, अधीक्षक यू. टी. पवार उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
भीमा-कोरेगाव प्रकरणात भिडे आणि एकबोटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्याविरोधात अद्यापि दोषारोपपत्र दाखल करण्यात आले नाही, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावेळी देशमुख म्हणाले, भिडे आणि एकबोटे यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.
आधुनिक कारागृह बांधण्याचा प्रस्ताव
कारागृहांतील कैद्यांची संख्या क्षमतेपेक्षा जास्त आहे. राज्यातील कारागृहांची क्षमता 22 हजार कैदी असताना प्रत्यक्षात 38 हजार कैदी कारागृहांत आहेत. पाश्चात्य देशांप्रमाणे महाराष्ट्रात आधुनिक कारागृह बांधण्याचा प्रस्ताव आहे. राज्यातील पोलिसांना निवासस्थाने देण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन असून, दोन्ही प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सादर करण्यात आले आहेत. पोलिसांना कमी व्याजदरात गृहकर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे, असेही देशमुख यांनी सांगितले.

































































