
केंद्र सरकारने स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (एसपीजी) सुरक्षा नियमात मोठे बदल केले आहेत. आता ही सुरक्षा असलेल्या व्यक्ती परदेश दौऱ्यावर गेल्यावर त्यांच्यासोबत सुरक्षेसाठी एसपीजीचे जवान तैनात असणार आहेत. याआधी अशा नेत्यांसोबत जवान जात नव्हते. मात्र, आता सरकार नियमात बदल करणार आहे. सरकारच्या या निर्णयाकडे राहुल गांधी आणि गांधी परिवाराच्या परदेश दौऱ्यांचा संबंध जोडण्यात येत आहे. पंतप्रधान आणि माजी पंतप्रधानांना एसपीजी सुरक्षा व्यवस्था देण्यात येते. सध्या ही सुविधा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हंगामी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वाड्रा यांनी देण्यात येते. ही सुविधा याआधी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाही देण्यात आली होती. मात्र, त्यांना सध्या झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे.
महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी राहुल गांधी परदेश दौऱ्यावर आहेत. राहुल गांधी बँकॉक, कंबोडिया किंवा नेमके कोणत्या देशात आहेत, याबाबतची माहिती देण्यात आलेली नाही. त्यांच्या या दौऱ्यावरून अनेकवेळा त्यांच्यावर टीकाही झाली आहे. ते नेहमी परदेश दौऱ्यावर जातात, त्यावेळी ते कोणत्या कारणासाठी आणि कोणत्या देशात जात आहेत, याबाबतची माहिती देण्यात येत नाही. राहुल गांधी हे विरोधी पक्षातील महत्त्वाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांचे दौरे गुप्त ठेवणे योग्य नसल्याचा आक्षेप घेत यावर टीका करण्यात आली आहे. याआधी राहुल गांधी 50 दिवसांची सुटी घेऊन परदेशात गेले होते. त्यावर भाजपकडून टीका करण्यात आली होती.
याआधी गांधी परिवार परदेश दौऱ्यावर जाताना गंतव्य स्थानापर्यंत एसपीजी सुरक्षेचा वापर करत होते, त्यानंतर खासगी दौरा असल्याचे सांगत ते ही सुरक्षा व्यवस्था परत पाठवत होते. मात्र, आता नियमात बदल झाल्याने संपूर्ण दौऱ्यात एसपीजीचे पथक आणि जवान त्यांच्यासोबतच असणार आहेत. देशातील महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेच्या दृष्टीने नियमात बदल करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आता एसपीजी सुरक्षाकवच गांधी परिवारासोबत असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच एसपीजी सुरक्षा कवचात असतात. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर पंतप्रधान आणि माजी पंतप्रधानांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी एसपीजी सुरक्षा व्यवस्थेची स्थापना करण्यात आली होती.



























































