सातारा, सांगली, कोल्हापुरात वेशांतर करून घरफोडी करणाऱयाला अटक

सांगलीसह सातारा आणि कोल्हापूर जिह्यांतील विविध गावांमध्ये वेशांतर करून मध्यरात्री मेडिकल दुकाने, बंद घरे फोडणाऱया सराईत चोरटय़ाच्या मुसक्या आवळण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले. एका सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तांत्रिक तपास करून आव्हानात्मक गुन्हे पोलिसांनी उघड केले. त्याच्याकडून घरफोडीचे तब्बल 16 गुन्हे उघडकीस आले असून, 64 तोळे सोने, 2 किलो चांदी, एक रिव्हॉल्वर असा एकूण 36 लाख 31 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

रमेश रामलिंग तांबारे (वय 46, रा. दत्तनगर, पलूस) असे अटक केलेल्याचे नाव आहे. सांगली जिह्यात घरफोडय़ांचे प्रमाण वाढले होते. त्यातच बंद घरे, मेडिकल दुकाने चोरटय़ांनी लक्ष्य केले होते. रात्रीच्या सुमारास वेशांतर करून येत चोरटे चोरी करून पलायन करायचे. पूर्णतः अंग झाकून आलेल्या एकटय़ा चोरटय़ाने जिह्यात घरफोडय़ा करून हैदोस मांडल्याने पोलिसांपुढे आव्हान उभे होते. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी तातडीने तपासाच्या सूचना दिल्या. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक घरफोडी झालेल्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासणी करीत असताना एकच व्यक्ती या घरफोडय़ा करीत असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी या एका फुटेजवरून तांत्रिक तपास सुरू केला. यावेळी सातारा आणि कोल्हापूर जिह्यातही अशाच पद्धतीचे गुन्हे घडल्याचे निष्पन्न झाले.

दरम्यान, एकजण चोरीचे सोने विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पथकातील एका कर्मचाऱयाला मिळाली होती. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या पथकाने शहरातील बायपास मार्गावर सापळा रचून संशयित रमेश तांबारे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे 16 तोळे सोने, 1 किलो 355 ग्रॅम चांदी, 80 हजारांची रिव्हॉल्वर आढळली. या मुद्देमालाबाबत चौकशी केली असता सदरचे दागिने हे कोल्हापूर जिह्यातील वडगाव, कर्नाळ, येडे निपाणी, सोनी तसेच रिव्हॉल्वर हे शिरगाव येथून चोरल्याचे सांगितले.

तपासादरम्यान त्याने मिरज ग्रामीण, तासगाव, कुरळप, सांगली ग्रामीण, ईश्वरपूर, कासेगाव, वडूज, पेठवडगाव आणि जयसिंगपूर याठिकाणी वेगवेगळ्या रात्री मेडिकल दुकाने, घरे, हॉस्पिटल फोडून चोरी केल्याचे सांगितले. त्याचबरोबर चोरीतील दागिने सराफाकडे गहाण ठेवल्याचे त्याने सांगितले. त्याच्याकडून घरफोडीसाठी वापरण्यात येणारी कटावणी, कटर, मारतुल, टॉर्च, मास्क, जर्किन, पोर्टेबल वजनकाटा जप्त केला.

पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहायक निरीक्षक संदीप शिंदे, संदीप गुरव, बिरोबा नरळे, सागर लवटे, अनिल कोळेकर, सागर टिंगरे, विक्रम खोत, संतोष गळवे, संदीप पाटील, अमोल ऐदाळे, उदयसिंग माळी, कॅप्टन गुंडवाडे, प्रकाश पाटील आणि बजरंग शिरतोडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

गुन्हा केल्यानंतर पुरावा सोडत नव्हता

रात्रीच्या वेळेस चार ते पाच ठिकाणी घरफोडी करून संशयिताने पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे केले होते. तांबारे हा गुन्हा केल्यानंतर कोणताही पुरावा मागे ठेवत नसल्याने पोलिसांची अडचण झाली होती. केवळ एका सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी कौशल्यपूर्ण तांत्रिक तपास करून संशयिताला बेडय़ा ठोकल्या. त्यामुळे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकास 25 हजारांचे रोख बक्षीस देणार असल्याची माहिती यावेळी दिली.