
सोलापूर- पुणे महामार्गावर पुण्याकडे निघालेल्या होंडा सिटी कार चालकाचा भोईंजे गावानजिक ताबा सुटल्याने होंडा सिटी कार दुभाजकावरून पलटी होऊन विरुद्ध दिशेने सोलापुरकडे जाणाऱ्या इनोव्हा कार व कंटेनरला जोरदार धडक होऊन झालेल्या विचित्र अपघातामध्ये कारमधील एक तरूणी व लहान मुलगी मयत झाली. या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले. हा अपघात सोमवार 22 ऑगस्ट रोजी दुपारी साडे चार वाजण्याच्या सुमारास झाला असून जखमींवर टेंभुर्णी व पंढरपूर येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातग्रस्त कारमधील कुटुंब हे सोलापूर येथील वास्तूशांतीचा कार्यक्रम उरकून पुण्याकडे जात असताना हा अपघात झाला.
या अपघातामध्ये माधुरी मल्लिनाथ चितकोटी (वय-30 रा.सोलापूर) ही जागीच ठार झाली असून पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात सानवी मयूर पाटील (वय- 7 रा. सोलापूर) हीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या अपघातामध्ये होंडा कारचालक मयूर मल्लिनाथ पाटील (वय-33), संगीता मयूर पाटील (वय-30) व मीरा मल्लिनाथ चितकोटी (वय-3 रा.सोलापूर) तसेच इनोव्हा कार मधील सलीम अब्दुल सय्यद (वय-30) व दिलीप सायप्पा गायकवाड (वय-70 रा.सोलापूर) हे जखमी झाले आहेत.
या अपघाताविषयी समजलेली अधिक माहिती अशी, होंडा सिटी कार (एम.एच-12-आरके-4774) ही सोलापूरहून पुण्याकडे निघाली होती. भोईंजे गावानजिक कारवरील नियंत्रण सुटल्याने ती दुभाजकावरून पलटी होत विरुद्ध दिशेला गेली. त्यावेळी पुण्याकडून सोलापूरकडे निघालेला कंटेनरला (एम एच -12- टीव्ही-6578) व इनोव्हा कारला (एमएच13-एझेड-2529) धडकली. हा अपघात एवढा जबरदस्त होता की अपघातग्रस्त कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला.
अपघाताची माहिती समजताच टेंभुर्णी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस फौजदार अभिमान गुटाळ, हवालदार मकबुल तांबोळी, पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद काटे तसेच मोडनिंब महामार्ग मदत केंद्रातील पोलिसांनी तातडीने अपघातस्थळी येऊन जखमींना टेंभुर्णी व पंढरपूर येथील रूग्णालयात उपचारासाठी पाठविले. पंढरपूर येथे सानवी पाटील हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
टेंभुर्णी पोलीस ठाण्यात आशिष शिवराज पाल (वय- 23 रा दुल्हापूर ता.जि. मिर्झापूर ) यांनी फिर्याद दाखल केली असून मयूर मल्लिनाथ पाटील (रा.सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदेश चंदनशीव करीत आहेत.




























































