
सामना ऑनलाईन । बोरीवली
बोरीवलीतील वीर सावरकर गार्डनमध्ये विषारी मधमाशांच्या चाव्यामुळे एकाचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी करुणा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आणि उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. ही घटना २७ जून रोजी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी बोरीवली वेस्टला एल.टी रोडवर असणाऱ्या वीर सावरकर गार्डनमध्ये फिरायला गेलेल्यांवर विषारी मधमाशांनी हल्ला चढवला. विषारी माशांच्या डंखामुळे जखमी झालेल्या पंकज शहा (५४) यांचा शुक्रवारी मृत्यू झाला तर रामनुज दाड (३२) आणि मेरिस्टा रामोना रोंगविला (४६) हे दोघे जखमी झाले. जखमींना तात्काळ करुणा हॉस्पिलटमध्ये दाखल करण्यात आले व उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले.
दरम्यान, गार्डनमधील विषारी माशांमुळे एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर महापालिकेचे कीटकनाशक पथक घटनास्थळी दाखल झाले आणि गार्डनमध्ये फवारणी करण्यात आली.






















































