सिंहगडावर पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला, आपत्ती व्यवस्थापन पथक व स्थानिक मदतीसाठी धावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

किल्ले सिंहगडावर काही उपद्रवी पर्यटकांच्या बेफिकीर कृत्यामुळे रविवारी दुपारी मधमाशांनी पर्यटकांवर हल्ला केला. गडाच्या तटबंदीवरून खाली दगड फेकल्यामुळे मधमाशांनी पर्यटकांवर हल्ला चढवला. यात 35 ते 40 जण जखमी झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी साडेतीनच्या सुमारास काही पर्यटक तटबंदीवरून खाली दगड फेकत होते. यातील दगड लागल्याने आग्या मोहोळ उठले. पर्यटकांच्या दिशेने मोठय़ा संख्येने मधमाशा आल्याने गडावर काही काळ गोंधळाचे वातावरण होते.  या घटनेत युवांश ऋषिकेश सोनार या दीड वर्षाच्या बालकासह त्याचे वडील ऋषिकेश नरेंद्र सोनार, निधी ऋषिकेश सोनार, कविता प्रसाद सोनार आणि अंश प्रसाद सोनार यांनाही मधमाशांनी चावा घेतला आहे.

वनव्यवस्थापन समितीचे सुरक्षा रक्षक मंगेश गोफणे आणि तानाजी खाटपे यांनी स्वतःच्या वाहनातून काही जखमींना गडावरून खाली आणले. स्थानिक वन कर्मचाऱयांना  घटनेची माहिती दिली.

वनव्यवस्थापन समितीचे सुरक्षा रक्षक नितीन गोळे, शंकर पढेर, रोशन पन्हाळकर यांनी मदत केली. हवेली आपत्ती व्यवस्थापन पथकानेही त्वरित धाव घेतली. आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीमचे गणेश सपकाळ, संदीप सोलस्कर, पथक प्रमुख तानाजी भोसले यांनी रुग्णवाहिका बोलावून जखमींना गडावरून खाली आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. वनपाल समाधान पाटील व वनरक्षक बळीराम वायकर यांनी समन्वय साधून काही काळासाठी गड पर्यटकांसाठी बंद ठेवला.