कोरोनानंतर आता ‘रॅट HEV’चा धोका, उंदरांपासून पसरतोय व्हायरस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरात सध्या कोरोना व्हायरसचे थैमान सुरू आहे. कोरोनामुळे 2 लाख 80 हजार मृत्यू झाले असतानाच आता नवीन संकट उभे ठाकले आहे. हाँग काँगमध्ये उंदरांपासून पसरणाऱ्या जीवघेण्या व्हायरसचे रुग्ण आढळून आले आहेत. हाँग काँगच्या आरोग्य मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या ‘सेंटर फॉर हेल्थ प्रोटेक्शन’ने (CHP) यास दुजोरा दिला असून याचा तपास सुरू केला आहे.

‘सेंटर फॉर हेल्थ प्रोटेक्शन’ने (CHP) याबाबत माहिती देताना सांगितले की, 30 एप्रिलला रॅट हेपेटाइटिस ई व्हायरसचा (HEV) पहिला रुग्ण आढळून आला होता. यामुळे लोकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले असून आतापर्यंत येथे 11 रुग्णांना याची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

हाँग काँगच्या क्वीन मेरी रुग्णालयात 7 एप्रिलला एका 61 वर्षीय रुग्णाला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 12 एप्रिलला त्याच्या यकृतात बिघाड झाला. त्यामुळे त्याला दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आले. येथे रक्ताची तपासणी करण्यात आली आणि अहवाल आला तेव्हा डॉक्टरही चिंतीत झाले. रुग्णाला ‘रॅट HEV’ची लागण झाल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली.

या नंतर प्रशासनाने तात्काळ रुग्णाच्या घराची तपासणी केली. मात्र घरात उंदराचे कोणतेही अस्तित्व दिसून आले नाही. तसेच या व्यक्तीने कुठेही बाहेर प्रवास केल्याचे आढळून आले नाही. तसेच रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीची तपासणी करण्यात आली मात्र त्यांच्यात या व्हायरसची कोणतीही लक्षणे दिसून आली नाहीत. मात्र आतापर्यंत 11 जणांना याची लागण झाल्याचे समोर आले आहे.

‘सीएनएन’च्या रिपोर्टनुसार, 2018 ला पहिल्यांदा ‘रॅट HEV’ची लागण झाल्याचा रुग्ण हाँग काँगमध्ये आढळला होता. ‘हेपेटाइटिस ई’ हा यकृताशी संबंधित आजार आहे. यामुळे रुग्णाला ताप येऊ शकतो आणि जॉन्डिसही होऊ शकतो.