
गेले तीन महिने हाँगकाँगमध्ये सुरू असलेल्या प्रत्यार्पण कायदाविरोधी आंदोलनाचे नेतृत्व करणारा डेमोसिस्टो पक्षाचा नेता जोशुआ वाँग याला चीनने शुक्रवारी अटक केली. त्याचबरोबर पक्षाच्या आणखी दोघा नेत्यांना अटक करण्यात आली. शनिवारी आणि रविवारी हे आंदोलन आणखी चिघळणार असल्याचे लक्षात आल्यावर चीनने ही कारवाई केली आहे. दरम्यान जोशुआसह तिघांची जामिनावर सुटका करण्यात आली.
ब्रिटनकडून हाँगकाँगचा ताबा चीनकडे गेल्यानंतर जगाचे आर्थिक केंद्र असलेल्या शहरावर चीनने अनेक निर्बंध लादले. हे शहर चीनचा स्वायत्त भाग असल्यामुळे त्यावर अंकुश ठेवण्यासाठी चीनने प्रत्यार्पण कायद्यात सुधारणा केली. या सुधारीत कायद्यानुसार स्थानिक पोलिसांना एखाद्या व्यक्तीला अटक करून प्रत्यार्पण कायदा करार नसलेल्या चीन, मकाऊ आणि तैवानसारख्या देशांना सोपवता येईल तसेच ज्या गुन्हेगारांना सात वर्षांपेक्षा जास्त वर्षे शिक्षा झाली आहे अशांचे प्रत्यार्पण चीनला करता येईल. हा कायदा म्हणजे मानवाधिकार कायद्याचे उल्लंघन असून हाँगकाँगच्या स्वायत्ततेवर घाला असल्याचा आरोप करत जोशुआ वाँग आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन पुकारले आहे.




























































