
हिंगोली जिल्हावासियांसाठी सलग तिसरा दिवस देखील दिलासादायक ठरला असून आज बुधवारी 13 मे रोजी 7 एसआरपीएफ जवान व सेनगाव येथील एक व्यक्ती अशा आठ जणांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे हिंगोलीची रुग्णसंख्या आता 45 झाली आहे.
हिंगोली येथील राज्य राखीव पोलीस दलातील 83 तर जालना येथील एक अशा 84 एसआरपी जवानांना कोरोनाची लागण झाल्यामुळे उपचार करण्यात आले होते. तसेच सेनगाव, वसमत व हिंगोली तालुक्यातील एका गावातील प्रत्येकी दोन रुग्ण व जिल्हा शासकीय रुग्णालयातील एका परिचारिकेला कोरोनाची बाधा झाल्यामुळे जिल्ह्यात एकूण 91 कोरोना बाधित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले होते. दरम्यान 11 मे रोजी 17, 12 मे रोजी 18 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. तर आज बुधवारी अर्थात 13 मे रोजी सलग तिसऱ्या दिवशी देखील 7 एसआरपीएफ जवान व सेनगाव येथील एका व्यक्तीचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे त्यांनी कोरोनावर मात केली आहे. या आठ रुग्णांना आज बुधवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे.
संभाजीनगर – आजपर्यंत 207 रुग्ण कोरोनामुक्त, 18 जणांचा मृत्यू; कोरोना बाधितांचा आकडा 684 वर
सध्या हिंगोलीत 36 तर संभाजीनगर येथे नऊ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, हिंगोलीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्ड तसेच सेनगाव, वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ, हिंगोली येथील विलगीकरण कक्षात एकूण एक हजार 402 व्यक्तींना भरती करण्यात आले होते. त्यापैकी एक हजार 303 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 1257 व्यक्तींना विलगीकरण कालावधी संपल्यामुळे अर्थात 14 दिवसानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 14 जणांचे अहवाल येणे प्रलंबित आहे.





























































