
गृहिणींचा अधिक वेळ हा स्वयंपाकघरातील कामे उरकण्यात जातो. घरातील कामांमुळे गृहिणींना ना आराम मिळतो, ना आपल्या आवडीनिवडी जपण्यासाठी वेळ. तासन् तास किचनमध्ये राबणाऱया आपल्या आईचे कष्ट कमी व्हावेत आणि तिला आराम मिळावा यासाठी दहावीत शिकणाऱया नवश्री ठाकूर या मुलीने मल्टीटास्किंग अर्थात बहुउपयोगी मशीन तयार केले आहे. पोळ्या लाटणे, भाज्या चिरणे, ज्यूस काढणे, मसाला वाटणे अशी तब्बल 25 प्रकारची कामे या मशीनद्वारे झटपट करता येतात.
गरज ही शोधाची जननी आहे ही म्हण मध्य प्रदेशातल्या होशंगाबाद येथील खेडेगावात राहणाऱया नवश्रीने प्रत्यक्षात खरी ठरवली आहे. पिपरिया येथील गर्ल्स हायस्कूलमध्ये सध्या ती शिक्षण घेतेय. मशीनची कल्पना कशी सुचली याबाबत ती म्हणाली, तासन् तास आईला स्वयंपाकघरात काम करताना पाहायचे. आई आपल्यासाठी खूप धावपळ करत असते. तिला घरकामात मदत करण्याची मला खूप इच्छा असते परंतु शाळा आणि अभ्यासामुळे मदत करणे जमत नाही. म्हणून तिच्यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे हा विचार सतत डोक्यात घोंघावत होता. त्यातूनच या मशीनची कल्पना मला सुचली.
हे मशीन बनवण्यासाठी नवश्रीला विज्ञानाच्या शिक्षिका आराधना पटेल यांची मोठी मदत झाली. तीन महिन्यांच्या कालावधीत हे मशीन तयार झाले असून त्यासाठी फक्त 3 हजार रुपये इतका खर्च आला आहे. भविष्यात हे मशीन अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचवण्याचे नवश्रीचे उद्दिष्ट आहे.
लाकडापासून तयार केलेल्या या मशीनसाठी ना विजेची आवश्यकता आहे, ना जादा मेहनतीची. राष्ट्रीय स्तरावर झालेल्या इन्स्पायर अवार्ड या स्पर्धेत तिच्या या मशीनला पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले असून नवश्रीचे सर्व स्तरातून काwतुक होत आहे.
























































