
सामना प्रतिनिधी । मुंबई
राज्यातील वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण तर दुसरीकडे घटणारे वनक्षेत्र यामुळे वन्य प्राण्यांचा, खासकरून बिबळ्यांचा मानवी वस्तीत वावर वाढत आहे. नागरी वस्तीत शिरल्यानंतर जखमी होणारे बिबळे व इतर वन्य प्राणी आणि वन्य प्राण्यांची पिले सापडण्याचे प्रमाणही वाढत आहे. या वन्य प्राण्यांवर तातडीने वैद्यकीय उपचार करण्यासाठी पुण्यात मुळशीजवळ बावीस एकर जागेवर वन्य प्राणी उपचार केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. या केंद्रासाठी 470 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
राज्यात, खासकरून पुणे जिह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर तालुक्यात गेल्या काही वर्षांत सिंचनात वाढ झाल्याने बागायती पिकांमध्ये पाणी मुबलक मिळत आहे. शेतीच्या जवळ मानवी वस्ती असल्याने बिबळे भक्ष्याच्या शोधात वस्तीत येतात. अन्न व पाण्याच्या शोधात वन्य प्राणी विहिरीत पडण्याच्या व रस्ते अपघातात जखमी होण्याच्या घटनाही वाढत आहेत. या जखमी प्राण्यांवर तातडीने उपचार करण्याची गरज आहे. जखमी झालेल्या वन्य प्राण्यांवर सध्या पुण्यातल्या राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील प्राणी बचाव केंद्र, चिंचवडमधील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालय व जुन्नरमधील माणिकडोह बिबटे बचाव केंद्र वगळता अन्य ठिकाणी वन्य प्राण्यांवर उपचार करण्यासाठी केंद्र नाही.
पुण्यात मुळशीजवळ केंद्र
त्यामुळे पुण्यात वन्य प्राणी उपचार केंद्र सुरू करण्याचा निर्णय राज्याच्या वन विभागाने घेतला आहे. पश्चिम महाराष्ट्रासाठी पुणे हे मध्यवर्ती केंद्र आहे. त्यामुळे रस्ते व इतर दळवळणांची सुविधा लक्षात घेता पुण्यात हे केंद्र सुरू करण्यात येणार आहे. या केंद्रात बिबळ्यांपासून कोल्हा, खोकड, लांडगा, तरस, हरीण, सांबर, माकड, लहानमोठे प्राणी, साप आदींवर उपचार करण्याची योजना आहे.
470 कोटी रुपयांचा प्रकल्प
या केंद्रात प्राण्यांच्या उपचारांसाठी खास उपचार केंद्र, एसी यंत्रणा तयार करण्यात येणार आहे. बावीस एकर जागेवर उभारण्यात येणार्या उपचार केंद्रावर 470 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. हा निधी तीन टप्प्यांत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर हा प्रकल्प उभारण्याची योजना आहे.























































