
वीज दरवाढ निश्चितीचा आदेश काढताना वीज नियामक आयोगाकडून राहिलेल्या त्रुटीचा भुर्दंड बिगर शासकीय आणि खासगी वसतिगृहामध्ये राहणाऱया विद्यार्थ्यांना बसत असल्याचे समोर आले आहे. नवीन आदेशानुसार उच्चदाब ग्राहक गटातून वीज कनेक्शन घेतलेल्या वसतिगृहांना सार्वजनिक सेवा गटातून वीज पुरवठा करून कमी दराने वीज बिल आकारणी होणे आवश्यक होते. मात्र आयोगाच्या नजरचुकीने बिगर शासकीय व खासगी वसतिगृहांचा समावेश सार्वजनिक सेवेत झाला नाही. त्यामुळे महावितरणकडून त्यांना लघुदाब घरगुती ग्राहक गटाप्रमाणे जादा दराने विजेचा पुरवठा केला जात असून त्याची किंमत विद्यार्थ्यांना मोजावी लागत आहे. त्यामुळे आयोगाने आपल्या आदेशातील त्रुटी दूर करावी म्हणून महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने वीज आयोगाकडे याचिका दाखल केली आहे.
वीज नियामक आयोगाने 2020-25 या कालावधीसाठी मार्चमध्ये वीज दर निश्चित केले आहेत. त्यानुसार शाळा, महाविद्यालये यांच्याशी संलग्न असलेले घटक, वसतिगृहांना सार्वजनिक सेवा या गटातून वीज पुरवठा करून त्याचा दर लावणे आवश्यक आहे. 1 एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी होणे आवश्यक होते. त्यानुसार शासकीय वसतिगृहाना योग्य दराने वीज पुरवली आहे. तसेच अन्य लघुदाब ग्रहकांबाबत स्पष्ट आदेश असल्याने त्यांनाही योग्य दराने वीज पुरवठा केला जात आहे. मात्र उच्चदाब वीज जोडणी असलेल्या बिगर शासकीय आणि खासगी वसतिगृहांच्याबाबत असलेल्या आदेशात त्रुटी आहेत. त्यामुळे त्यांना आजही लघुदाब घरगुती ग्राहक या गटाप्रमाणे जादा दराने वीज पुरवठा केला जात आहे. या त्रुटी दूर करून संबंधित वसतिगृहाबरोबरच तेथे वास्तव्याला असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी वीज ग्राहक संघटनेने केली आहे.
भूमिगत वीज जोडणीचा फटका
वीज आयोगाने वीज दर निश्चितीचा आदेश काढताना राहिलेल्या त्रुटीचा फटका भूमिगत वीज जोडणी असलेल्या शहरी ग्राहकांना बसत आहे. नवीन सेवा जोडणी आकार 0-5 किलोवॅटपर्यंत 3400 रुपये तर पाच किलोवॅटच्या पुढे 7600 रुपये निश्चित केला आहे. मात्र आदेश काढताना पाहिला टप्पा 0-0.5 किलोवॅटचा झाला असून दुसरा टप्पा 0.5 किलोवॅटपासून पाच किलोवॅट पर्यंत असा झाला आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यासाठी 3400 रुपये मोजावे लागत असून याआधी ज्या 5 किलोवॅटसाठी 3400 रुपये मोजावे लागत होते, त्यासाठी आता 7600 रुपये म्हणजे दुप्पट रक्कम मोजावी लागत आहे.























































