Video – डब्याचं झाकण वितळून सुपात पडलं, गरम सूप मॅनेजरच्या तोंडावर फेकले

हॉटेलमध्ये आलेले काही ग्राहक हे अत्यंत गरम डोक्याचे असतात. जेवण खराब असेल किंवा त्यात काही पडलं असेल तर ते वाद घालतात. अमेरिकेत एका महिलेने सुपात प्लॅस्टीक पडलं असल्याने ते हॉटेलच्या मॅनेजरच्या तोंडावर फेकलं. ही घटना रविवारी म्हणजेच 7 नोव्हेंबर रोजी घडली आहे. टेक्सास भागातील एका हॉटेलमध्ये ही घटना घडली असून यामुळे हॉटेलची मॅनेजर जेनेल ब्रोलँडच्या चेहऱ्याला इजा पोहोचली आहे.

एका महिलेने मेक्सिकन मेन्यूंडो नावाचं सूप मागवलं होतं. हे सूप गरम असतानाच डब्यात भरण्यात आलं होतं. सूप इतकं गरम होतं की डब्याचं झाकण वितळून ते सुपात पडलं होतं. यामुळे ग्राहक महिला संतापली होती. तिने जेनेलशी यावरून हुज्जत घालायला सुरुवात केली होती. जेनेल शांतपणे तिच्याशी बोलत असताना महिलेने सुपाच्या डब्याचं झाकण काढून ठेवलं आणि जेनेल बेसावध असताना तिच्या तोंडावर सूप फेकलं. सूप फेकल्यानंतर ही महिला तिथून पळून गेली. हे सूप तिखट आणि गरम असल्याने जेनेलच्या चेहऱ्याची जळजळ व्हायला लागली होती. हा प्रकार धक्कादायक आणि भीतीदायक असल्याची प्रतिक्रिया जेनेलने दिली आहे.

जेनेलने या प्रकाराबाबत बोलताना सांगितलं की तक्रारदार महिलेला तिने पैसे परत दिले होते आणि मोफत जेवणही देण्याचं आश्वासन दिलं होतं. तरीही या महिलेने जेनेलच्या तोंडावर सूप फेकलं. या घटनेची पोलिसांनीही दखल घेतली असून जर रेस्टॉरंटने वाईट सेवा दिली तर त्याविरोधात कायदेशीर मार्गाने निषेध नोंदवता येऊ शकतो असं म्हण पोलिसांनी ही घटना चुकीची असल्याचं म्हटलं आहे.