उच्चशिक्षित तरुणीवर हॉटेल व्यावसायिकाचा बलात्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मालवण

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी वायरी भूतनाथ येथील हॉटेल व्यावसायिक केदार झाड याच्यावर मालवण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेले काही दिवस मानसिक दडपणाखाली असणाऱ्या संबंधित पीडित युवतीने व तिच्या पालकांनी पोलिसात धाव घेऊन केदार याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. केदार याने तरुणीला पर्यटनाच्या निमित्ताने कुलू मनाली, केरळ व अन्य  काही ठिकाणी नेऊन शरीर संबंध प्रस्थापित केले व त्यानंतर दुसऱ्याच मुलीशी लग्न करून पीडित तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिली असेही तक्रारीत म्हटले आहे.

मालवण शहरानजीकच्या एका गावात राहणारी सदर पीडित युवती ही उच्चशिक्षित आहे. शिक्षणासाठी तीन वर्षे कणकवली येथे राहत असताना २०१६ मध्ये या तरुणीची केदार या हॉटेल व्यावसायिक असणाऱ्या तरुणाशी ओळख होऊन त्यांची मैत्री झाली. कालांतराने या मैत्रीचे रुपांतर प्रेमामध्ये झाले. मार्च २०१७ मध्ये केदार याने तरुणीच्या घरी येऊन तिला लग्नाबद्दल विचारले असता, तरुणी व तिच्या आई वडिलांनी होकारही दिला होता. यानंतर तरुणीच्या कणकवली येथील खोलीवर गाठीभेटी होत असताना केदार हा तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करत असे. मात्र तरुणी त्यास नकार देत असे.

११ एप्रिल २०१७ रोजी केदारने तरुणीला तिच्या खोलीवर घेऊन गेला. त्यावेळी त्याने तरुणीच्या नकळत दारू मिसळलेले शितपेय पाजल्याने तिला गुंगी आली. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. आपण लग्न करणार असल्याचे सांगत केदारने तिच्याशी अनेकदा बलात्कार केला. त्याने तरुणीला पर्यटनाच्या निमित्ताने कुलू मनाली, केरळ व अन्य  काही ठिकाणी नेऊन शरीर संबंध प्रस्थापित केले.

मनाली येथुन आल्यावर लग्नाबाबत केदार कोणताही शब्द काढत नसल्याने त्याबाबत तरुणीने विचारले असता, केदार याने तरुणीला तिच्या वाढदिवसादिवशी तालुक्यातील एका गावातील मंदिरात नेऊन कुंकु लाऊन व मंगळसुत्र घालुन तिच्यासोबत लग्न केल्याचा दिखावा केला. एप्रिल २०१८ पासुन केदार तरुणीशी बोलणे व भेटणे टाळु लागला. या दरम्यान दुसऱ्या एका मुलीशी प्रेम प्रकरण सुरु असल्याची कुणकुण तरुणीला लागली. याबाबत तरुणीने जाब विचारला असता आपले लग्न माझ्या घरात मान्य नसल्याचे सांगत यापुढे संबंध ठेवणे शक्य नसल्याचे सांगितले. दोघांमध्ये झालेल्या भांडणात केदारने तरुणीला मारहाण करत पिस्तुल काढुन तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती.

केदारच्या एका मित्राने  ८ जुन २०१८ रोजी तरुणीला फोन करुन केदारने लग्न केल्याचे सांगितले. तरुणीने केदारला फोन करुन याबाबत विचारले असता केदारने माझे काय करायचे ते करुन घे असे सांगितले. तरुणीने आपल्या पालकांना केदारने लग्न केल्याचे सांगितल्यावर त्यांनी महिला अत्याचार निवारण कक्षात धाव याबाबत पोलिसात तक्रार करण्याचा सल्ला देण्यात आला. केदार व त्यांच्या कुटुंबियांनी तरुणीच्या कुटुंबियांशी तडजोड करण्याचा प्रयत्न केला. मात्र मानसिक दडपणाखाली असलेल्या तरुणीने अखेर शनिवारी सायंकाळी मालवण पोलीस स्थानकात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला असून त्याचा शोध सुरू आहे.  मात्र तो परदेशात असल्याची माहिती समोर आली आहे.