
नगर शहरातील सुभेदार गल्लीमध्ये एका दिवसात चार कोरोनाचे रुग्ण आढळल्यामुळे हा भाग जिल्हाधिकाऱ्यांनी हॉटस्पॉट जाहीर केला आहे. या भागातील रहदारीसाठी केवळ एकच रस्ता राहणार असून बाहेरच्या लोकांना या भागात प्रवेशास बंदी करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली आहे. या भागातील अत्यावश्यक सेवेची दुकानेही 27 मेपर्यंत बंद राहणार आहेत. महापालिकेमार्फत अत्यावश्यक सेवेचा पुरवठा केला जाणार आहे. महापालिकेचे आयुक्त त्यासाठी नियंत्रण अधिकारी असणार आहेत. यापूर्वी नगर शहरात मुकुंदनगर हॉटस्पॉट होते. 24 एप्रिल रोजी तेथील हॉटस्पॉटची मुदत संपली आहे.
झेंडीगेट परिसरात दोन दिवसांत कोरोनाचे पाच रुग्ण आढळल्याने, हा परिसर मध्यरात्रीपासून “हॉटस्पॉट’ करण्यात आला आहे. या परिसरातील नागरिकांना गुरुवारी सकाळपासून महापालिका प्रशासन जीवनावश्यक वस्तू पुरविणार आहे. मुकुंदनगर “हॉट स्पॉट’मधून बाहेर येऊन 19 दिवस झाल्यानंतर झेंडी गेट परिसर “हॉट स्पॉट’ झाला आहे. या परिसरातील सुभेदार गल्लीत मंगळवारी एक महिला कोरोनाबाधित आढळली होती. त्यानंतर महापालिकेने परिसरातील नागरिकांचे घशातील स्राव तपासणीसाठी पाठविले होते. त्यांतील काही अहवाल गुरुवारी मिळाले आहेत. यात आणखी चारजण कोरोनाबाधित असल्याचे आढळले. मंगळवार दुपारपासून हा परिसर सील करण्यात आला आहे. अहवाल मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी झेंडी गेट परिसराची पाहणी केली. या वेळी जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार, शहर अभियंता सुरेश इथापे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी हा परिसर “हॉट स्पॉट’ म्हणून जाहीर करण्याचा निर्णय घेतला.


























































