
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील आंबेड खुर्द येथे चौपदरीकरणाच्या कामात डोंगर खोदाई केल्यानंतर दरड कोसळून लागली असून यामुळे घराला धोका निर्माण झाला आहे. मुसळधार पावसामुळे कधीही घर कोसळण्याच्या स्थितीत असून ठेकेदार कंपनीकडून घराच्या संरक्षणासाठी उपाययोजना करण्याची मागणी ग्रामपंचायत तसेच घरमालकांनी केली आहे.
आंबेडखुर्द येथे निसार अन्वर खान यांचे घर आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चौपदरीकरणाच्या कामामुळे डोंगर खोदाई करण्यात आलेली आहे. यावेळी खान कुटुंबियांनी बांधकाम विभाग तसेच ठेकेदार कंपनीला निवेदन देऊन या खोदाईमुळे घराला धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली होती. त्याकडे ठेकेदार कंपनीने दुर्लक्ष केल्याचा आरोप खान कुटुंबियांनी केला आहे. संगमेश्वर तालुक्यात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस पडत असून आंबेड खुर्द येथील दरड कोसळून खाली येऊ लागले आहे. त्यामुळे निसार खान यांचे घराला तडे गेले आहेत.
घर धोकादायक झाल्याने सरपंच चंद्रकांत फणसे तलाठी शकील पटेल पोलीस पाटील सुरेश राहाटे, सामाजिक कार्यकर्ते मुराद आंबेडकर, उपसरपंच बबन कांबळे ,ग्रामस्थ अनिल बोले आदींनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली या पाहणीमध्ये घर धोकादायक झाले असल्याचे सरपंच चंद्रकांत फणसे यांनी सांगितले.




























































