बिनडोक विनोदाचा चौथा अंक

2599

सिनेमा वायफळ असणार हे आपल्याला थिएटरमध्ये शिरायच्या आधीच ठाऊक असतं. त्यातल्या वायफळ विनोदांवर आपण त्या त्या वेळी हसतोदेखील, पण तरीही थिएटरमधून बाहेर पडताना, काय हे, अगदीच अर्थ नव्हता या सिनेमाला असंदेखील अगदी मनापासून उच्चारतो, तेव्हा तो सिनेमा हाऊसफुल असतो…

हाऊसफुल या सिनेमा मालिकेचे एक, दोन, तीन झाल्यावर चार काय असेल हा अंदाज प्रेक्षकांनी नक्कीच बांधला असेल. आणि त्यातला अर्थहीन गोंधळ माहीत असूनही चौथ्याला जाणाऱया प्रेक्षकांची मनाची तयारी नक्कीच असेल. अशा प्रेक्षकांची दोन घटका करमणूक करण्यासाठी हाऊसफुल थोडा फार यशस्वी नक्कीच ठरतो. पण तरीही विनोदाची ओढाताण, तोच तोचपणा आणि तर्क शुद्धतेचा अगदीच अभाव यामुळे तो न बघितल्यानेही फार काही बिघडत नाही.

लंडनमध्ये राहणारे तीन भाऊ, त्यांच्या तीन प्रेयसी, त्या प्रेयसीचे गडगंज श्रीमंत असणारे वडील असा हा गोतावळा. थोडी फार नाच गाणी झाल्यावर लंडनमध्ये राहणारी मंडळी डेस्टिनेशन वेडिंग करण्यासाठी हिंदुस्थानमध्ये येतात. तिथे सगळय़ांनाच त्यांचा सहाशे वर्षे जुना भूतकाळ आठवायला लागतो. पुनर्जन्मानंतर हे सगळे पुन्हा एकदा भेटले असतात. मग मागच्या जन्माचा बदला कोण, कधी, कसा घेतो आणि गेल्या जन्माचं ऋण या जन्मात कसं फेडतात त्याची ही गोष्ट. खरं तर हाऊसफुल या शब्दाशी काडी मात्र संबंध नाही. पण तरीही अक्षय कुमारचे वेडे चाळे सादर करायला हा सिनेमा हाऊसफुल या पठडीत कोंबला आहे.

अक्षय कुमार, रितेश देशमुख, बॉबी देवल, दोन्ही क्रिती आणि पूजा हेगडे या सगळय़ांचा अभिनय बरा झालाय. तिघीही जणी सुंदर नाजूक बाहुल्या म्हणूनच या सिनेमात वावरल्या आहेत आणि या गरजेसाठी त्या तिघी चपखल बसल्या आहेत.

सिनेमाच्या पटकथेला काहीही अर्थ नाही. विनोदांवर हसू येतं, पण दुसऱयाच क्षणी तो विनोद काय होता हे लक्षातदेखील राहत नाही. नाच गाणी बरी जमली आहेत. भव्य दिव्य दृश्य, रंगीबेरंगी वातावरण बघायला बरं वाटतं. भले मोठे महाल, काळे भिन्न राक्षसी सैनिक, पुनर्जन्म, बदला हे सगळं बघताना कट्टपा, बाहुबली आठवल्याशिवाय राहवत नाही. बाहुबली सिनेमाचा अर्क काढून त्याला फुटकळ विनोदाची फोडणी दिली की कसं वाटेल तसं काहीसं हा सिनेमा पाहताना वाटतं.

पण गेल्या जन्मी तो टकला का होता, या जन्मी तो गजनी का आहे, त्याला अचानक सगळं कसं आठवतं, त्याचा क्रूरपणा का असतो, तो अचानक नाहीसा कसा होता… कशाचा कशाला काहीच पायपोस नाही. एकूणच सगळा बिनडोक कारभार अडीच तास चालतो. अर्थात अगदी कंटाळवाणा, असह्य नसला तरीही अव्वल करमणूकदेखील हा सिनेमा पाहताना गवसत नाही.

सुट्टी आहे, अगदीच काही करायला नाही, डोकं बाजूला ठेवून फक्त जे मिळेल तो टाईमपास चालेल असं वाटत असेल तर हा सिनेमा एक पर्याय ठरू शकतो. पण त्यासाठी अपेक्षा मात्र शून्य ठेवणं अत्यंत गरजेचं आहे.

  • सिनेमा-हाऊसफुल 4
  • दर्जा- अडीज स्टार
  • निर्माता-फॉक्स स्टार स्टुडिओ,नाडियाडवाला ग्रँड सन एन्टरटेन्मेंट
  • दिग्दर्शक-फरहाद सामजी
  • कलाकार-अक्षय कुमार, बॉबी देओल,रितेश देशमुख, क्रीती सॅनन, क्रीती खरबंदा, पूजा हेगडे, चंकी पांडे.
आपली प्रतिक्रिया द्या