
सरकारी काम आणि सहा महिने थांब असे विनोदाने म्हटले जाते, पण प्रत्यक्षात सुधागड तालुक्यातील चिवे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या खुरावळे गावातील आदिवासींना अशीच काहीशी परिस्थिती अनुभवायला मिळत आहे. घरकुलाचा हप्ता थकला असल्याने या आदिवासींचा संसार उघड्यावर आला असून खुरावळेवासीय अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.
प्रत्येक गोरगरीबाला स्वतःचे छप्पर मिळावे यासाठी केंद्र सरकारकडून घरकुल योजनेची अंमलबजावणी करण्यात येते. त्यानुसार चिवे ग्रामपंचायत हद्दीतील खुरावळे आदिवासी वाडीतील सहा कुटुंबांनी आपले राहते घर पाडून त्याठिकाणी मंजूर घरकुलांतर्गत बांधकामाला सुरुवात केली. घरकुल मंजूर झाल्याने ग्रामसेवकांनी त्यांना घर पाडून घरकुल बांधण्याची परवानगी दिली. त्यामुळे त्यांनी आपली झोपडी पाडून घरकुलाची पायाभरणीही केली. त्यांना घरकुलाचा पहिला हप्ताही मिळाला. परंतु अचानक ग्रामसेवकाने स्थानिक तक्रार करत असल्याचे सांगून घरकुलाचे कामाची बिले थांबवली.
सध्या आमच्या कुटुंबाला निवारा नसल्याने जंगल पट्ट्यात उघड्यावर जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे. पूर्ण रक्कम देऊन आम्हाला घरकुल पूर्ण करू द्या. ऐन पावसाळ्यात आमच्या कुटुंबातील सदस्यांचे काही बरे वाईट झाल्यास त्यास संबंधित प्रशासन जबाबदार असेल. गीता वाघमारे (घरकुल लाभार्थी)
गीता वाघमारे, लता वाघेरे, गुलाब वाघमारे, आशा हिलम, नथू पवार, दीपाली पवार ही सहा कुटुंबे हवालदिल झाली आहेत. मुलाबाळांसह उघड्यावर राहावे लागत असल्याने वन्यप्राण्यांच्या दहशतीखाली आपला संसाराचा गाडा हाकत आहेत. हक्काचे छप्पर आम्हाला मिळवून द्यावे व आमच्या मुलाबाळांचे रक्षण करावे, अशी भावनिक साद घालत आहे.