
पालिकेच्या 24 वॉर्डमधील उद्यानांच्या देखभाल-दुरुस्तीचे काम पालिकेने अंदाजित केलेल्या रकमेपेक्षा तब्बल 40 टक्के कमी दराने करणारच कसे, असा सवाल उपस्थित करीत आज स्थायी समितीने संबंधित प्रस्ताव पालिका प्रशासनाकडे परत पाठवला. मुंबईकरांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी सुधारित प्रस्ताव आणावा, अशी भूमिका या वेळी शिवसेनेसह सर्वपक्षीयांनी मांडली.
उद्यानांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी पालिकेने अंदाजित केलेल्या रकमेनुसार मुंबई शहर विभागासाठी 59 कोटी, पश्चिम उपनगरासाठी 26 कोटी आणि 46 कोटी पूर्व उपनगरासाठी खर्च करण्यात येणार होते. मात्र या कामासाठी पालिकेने अंदाजित रकमेला निविदाकार प्रतिसाद देत नसल्यामुळे तब्बल 40 टक्क्यांनी कमी दराने निविदा भरलेल्या कंत्राटदाराला हे काम देण्यासाठी 100 कोटींचा प्रस्ताव मांडण्यात आला. यावर आक्षेप घेत सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी संबंधित कंत्राटदार कामाचा दर्जा कसा राखणार, असा सवाल उपस्थित उपसूचना मांडून संबंधित प्रस्ताव परत पाठवण्याची मागणी केली. याला सर्वपक्षीयांनी पाठिंबा दिला. पालिकेने नेमलेले कंत्राटदार कोटय़वधी रुपये घेऊनही उद्यानांची योग्य निगा राखत नसल्याचे या वेळी सर्व सदस्यांनी सांगितले.
बेजबाबदार कंत्राटदारांवर कारवाई करा!
उद्याने-मैदानांच्या देखभालीसाठी कोटय़वधी रुपये घेऊनही अनेक ठिकाणी कंत्राटदार कामाचा दर्जा राखत नसल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले. झाडांच्या धोकादायक फांद्या तोडण्यासाठी तब्बल 150 कोटींचे कंत्राट देऊनही संबंधित कंत्राटदार योग्यरीत्या काम करीत नसल्याचेही जाधव यांनी स्पष्ट केले. त्यामुळे अशा बेजबाबदार कंत्राटदारांच्या कामांची तपासणी करावी आणि कामात हलगर्जीपणा केलेल्या कंत्राटदारांवर कारवाई करावी, असे निर्देशही यशवंत जाधव यांनी पालिका प्रशासनाला दिले.





























































