कीटकनाशक फवारताना मृत्यू होऊ नये म्हणून अशी घ्या खबरदारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उदय जोशी । बीड

मागील वर्षातील खरीप हंगामात कीटकनाशकांची फवारणी करताना राज्यभरात अनेक शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला होता. यावर्षीच्या हंगामात त्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून जिल्ह्यातील गेवराई, माजलगाव, अंबाजोगाई, आष्टी आणि परळी येथील बाजार समीती, काही गावातील शेती बांधावर एफएमसी या संस्थेच्या वतीने कीटकनाशक वापराच्या जनजागृतीची मोहीम हाती घेण्यात आली होती. पीक संरक्षक उत्पादनांचा सुरक्षित वापर आणि कीटकनाशकाच्या सुरक्षित फवारणीची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी एफएमसी या संस्थेच्या वतीने शेतकऱ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत शेतकऱ्यांना पीक संरक्षक उत्पादनांचा म्हणजेच कीटकनाशकांचा सुरक्षित वापर या विषयावर प्रशिक्षण देण्यात आले. सोबतच शेतकऱ्यांना मोफत संरक्षण कीटचे वाटप करण्यात आले.

पिकांना आळी आणि किडींचा प्रादुर्भाव झाल्यानंतर पिकांचे नुकसान टाळण्यासाठी कीटकनाशकांचा वापर योग्य पद्धतीने केल्यास फायदेशीर ठरते. मात्र, फवारणी करताना शेतकऱ्यांनी स्वतःची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे असते. शेतकऱ्यांना कीटकनाशकांच्या उत्पादनावरील सूचनाबाबत शेतकऱ्यांना शिक्षण देऊन वापराचे महत्त्व पटवून देणे, योग्य त्या प्रमाणात, योग्य उत्पादन आणि सुरक्षा सामुग्रीचा वापर करणे गरजेचे असल्याने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे एफएमसी इंडिया या संस्थेचे प्रमोद थोटा यांनी सांगितले. शिवाय योग्य ते उत्पादन योग्य सुरक्षात्मक उपकरणांसह आणि लेबलवर दिलेल्या अचूक नियमानुसार वापरले पाहिजे. ज्यामुळे या कीटकनाशकाद्वारे केवळ पिकाचे संरक्षण न होता वापरणारे, पर्यावरण आणि माणसासाठी देखील सुरक्षित असली पाहिजेत, असेही प्रमोद थोटा यांनी सांगितले.