
दररोज आहारात भाताचा समावेश केल्यास जेवण पूर्ण होते. काही जणांना तर रोजच्या जेवणात भात लागतोच, त्याशिवाय जेवण पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही. तांदळात प्रथिने, जीवनसत्त्व, खनिजे, कार्बोहायड्रेट्स आणि फायबर जास्त प्रमाणात असते. अनेकांना रोजच्या आहारात भात खायला खूपच आवडतो, मात्र हल्ली तांदळात मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. खऱ्या आणि खोट्या तांदळातील फरक सोप्या पद्धतीने समजून घेता येऊ शकतो. तांदूळ खरेदी करण्यापूर्वी काही टिप्स वापरून खरा आणि खोटा तांदूळ कसा ओळखायचा हे पाहूया.
खरा बासमती तांदूळ कसा ओळखाल ?
तांदळात भेसळ करण्यासाठी खऱ्या तांदळात प्लास्टिकचे तांदळू मिसळले जातात. प्लास्टिकचा हा खोटा तांदूळ खाल्ल्याने अनेक प्रकारचे आजार होण्याची शक्यता असते. तांदळाच्या सर्व जातींमध्ये बासमती तांदूळ सर्वात महाग आहे. बासमती तांदूळ चमकदार, पारदर्शक आणि सुगंधी असतो. शुद्ध बासमती तांदूळ लांबडा असतो. हा तांदूळ शिजवल्यानंतर वेगळा होतो, बनावट बासमती तांदूळ शिजवल्यानंतर एकत्र चिकटून राहतो.
तांदूळ रंग चाचणी
चुन्याच्या साहाय्याने तांदळाच्या रंगाची चाचणी करून खरा आणि बनावट तांदूळ ओळखता येऊ शकतो. यासाठी पाण्यात चुना विरघळवून घ्या. आता या पाण्यात तांदळाचे काही दाणे टाका. काही वेळाने नकली तांदळाचा रंग निघू लागतो, मात्र तांदूळ खरा असल्यास तांदळाचा रंग निघत नाही.
तांदळाची फायर टेस्ट
– खरा आणि नकली तांदूळ ओळखण्यासाठी तांदळाची फायर टेस्ट करून पाहू शकता. यासाठी तांदळाचे काही दाणे आगीत टाकावेत. यामुळे प्लास्टिकच्या तांदळाचा वास येतो, तेव्हा समजावे की, हा तांदूळ बनावट आहे.
– बनावट तांदूळ गरम तेलात टाकल्यावर वितळतो.
तांदूळ पाण्याची चाचणी
पाण्याचा वापर करूनही खरा तांदूळ तपासता येऊ शकतो. बनावट तांदूळ प्लास्टिकपासून बनवलेले असल्यामुळे खूप हलके असतात. अशा वेळी बनावट तांदूळ पाण्यात टाकल्यावर पाण्यावर तरंगू लागतो. काही वेळा हे तांदूळ पाण्यात सहजपणे बुडतात.





























































