पावसाळ्यात होणाऱ्या आजारांवर स्वयंपाकघरातच उपचार करा

पावसाळ्यात वातावरणात सर्वत्र ओलावा असतो आणि तापमानातील चढउतारांमुळे बॅक्टेरिया, विषाणू आणि बुरशी, डास आणि अनेक प्रकारचे कीटक वेगाने वाढतात. यामुळे पचनक्रिया कमकुवत होते आणि सर्दी, खोकला, फ्लू, डेंग्यू, मलेरिया इत्यादी आजार होण्याची शक्यताही वाढते.

पचनसंस्था कमकुवत झाल्यामुळे, या काळात शरीराची संसर्गाशी लढण्याची क्षमता देखील कमी होऊ शकते. अशा परिस्थितीत, लवकर आजारी पडू नये म्हणून मजबूत रोगप्रतिकारक शक्ती असणे महत्वाचे आहे. अशाच दोन काढ्याची पाककृती जाणून घेऊया ज्या पावसाळ्यात तुम्हाला निरोगी राहण्यास मदत करतील.

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी शरीराला पुरेशा पोषक तत्वांची आवश्यकता असते, म्हणून संतुलित आहार घेतला पाहिजे. पावसाळ्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी काही घरगुती उपाय देखील उपयुक्त ठरू शकतात.

हळद, आले, तुळस काढा

साहित्य
1 छोटा आल्याचा तुकडा
5-6 तुळशीची पाने
4 ते 5 काळी मिरी, दोन कप पाणी आणि कच्च्या हळदीचा एक छोटा तुकडा.
याशिवाय तुम्ही एक चमचा मध किंवा गुळाचा एक छोटा तुकडा घेऊ शकता.

कृती
एका पॅनमध्ये पाणी घाला त्यानंतर त्यामध्ये आले आणि तुळशीची पाने बारीक तुकडे करून किसून घाला. याशिवाय, किसलेली हळद घाला आणि काळी मिरी देखील कुस्करून घ्या आणि पाण्यात घाला. ते मंद आचेवर 10 मिनिटे उकळू द्या. यामुळे पाणी जवळजवळ अर्धे होईल. ते गाळल्यानंतर, काही वेळ बाजूला ठेवा, जेव्हा हा काढा कोमट होईल तेव्हा त्यात मध घाला आणि प्या. हा काढा तुम्हाला फ्लूपासून वाचवेलच, शिवाय घसा खवखवणे, सर्दी आणि खोकल्यामध्ये देखील फायदेशीर आहे.

Hair Care – पावसाळ्यात केसांना किती प्रमाणात तेल लावायला हवे? वाचा

गुळवेल काढा

साहित्य
हा काढा बनवण्यासाठी सर्वात महत्वाचा घटक म्हणजे गुळवेल
3 ते 4 इंच आकाराचे दोन ते तीन तुकडे गुळवेल
अर्धा चमचा दालचिनी पावडर किंवा एक छोटा दालचिनीचा तुकडा
3 ते 4 तुळशीची पाने
लिंबाचा रस

कृती
एका भांड्यात पाणी घ्या आणि गुळवेल किसून त्यात घाला, त्यानंतर दालचिनी आणि तुळस घाला आणि मंद आचेवर 10-15 मिनिटे उकळवून घ्या . त्यानंतर काढा गाळून घ्या. थोडा थंड झाल्यावर त्यात लिंबाचे काही थेंब घाला. हा काढा प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास देखील मदत करतो. हा काढा प्यायल्याने तापापासूनही आराम मिळतो.

टीप: जर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या आरोग्य समस्या असतील तर प्रथम तज्ञांचा सल्ला घ्या आणि त्यानंतरच हा काढा बनवा आणि प्या.