विषारी साप चावलाय ते कसं ओळखाल? ही आहेत लक्षणं…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ग्रामीण भागात अनेकदा सर्पदंशाच्या अनेक घटना घडतात. पण, चावलेला साप विषारी आहे किंवा बिनविषारी ते सहजरित्या कळून येत नाही. त्यामुळे ज्याला तो चावतो, त्याची परिस्थिती भीतीनेच बिघडते. तसंच, साप चावल्यानंतर नेमकी अशी कोणती लक्षणं असतात, ज्यामुळे तो विषारी आहे किंवा नाही, हे ओळखता येऊ शकेल? हेही कळून येत नाही.

पण, विषारी साप चावल्याची काही थेट लक्षणं दिसून येतात. ती वेळीच ओळखणं गरजेचं असतं. कोरा या प्रश्नोत्तराच्या संकेतस्थळावर विषारी सर्पदंशानंतर दिसणारी लक्षणं देण्यात आली आहेत. ती पुढील प्रमाणे आहेत.

1) नाग :-
नाग डसल्यानंतर दंशाच्या जागी जळजळ होऊन सूज येऊ लागते. शरीर जड होऊन ग्लानी येते. डोळ्यांच्या पापण्यांवर नियंत्रण राहत नाही. हातपाय गळल्यासारखे वाटतात. श्वास घेण्यास त्रास होतो, नाडी मंद होऊन हृदयाचे ठोके वाढतात. चेतासंस्थेवर परिणाम होऊन तोल सांभाळता येत नाही.

2) मण्यार :-
मण्यार सापाचे विषाचे दात लहान असल्यामुळे साप चावल्यानंतरही साप चावल्याची जाणीव सहसा होत नाही. मण्यारचे विष नागापेक्षा जहाल असून दंशांनंतर पोटात, सांध्यांमध्ये वेदना 5 ते 6 तासानंतर सुरू होतात. चावल्याजागी सूज किंवा जळजळ होत नाही.

3) घोणस/परड :-
घोणस सापाचे विषाचे दात अतिशय मोठे असतात त्यामुळे दंशाच्या जागी तीव्र वेदना व सूज येते. नाडीचे ठोके अनियमित होतात. कित्येकदा तोंडावाटे, नाकावाटे व लघवीतून रक्त पडते. व्यक्ती डोळे न लावता एकटक सारखा पाहत राहते. किडनी नाकामी होते. दंशाच्या जागेवर खूप सूज येते.

4) फुरसे :-
फुरशाच्या आकाराच्या मानाने त्याचे विषाचे दात लांब असतात. त्याचे विष घोणसपेक्षा जहाल असते. त्याच्या विषामुळे रक्ताच्या गुठळ्या होतात. दंश झालेल्या जागी प्रथम जळजळ सुरू होऊन नंतर ती संपूर्ण अवयवांवर पसरते. दंश झालेल्या भागातून, लघवीतून व हिरडीतूनही रक्त पडते. त्यामुळे अशक्त पणा येतो.

5) पट्टेरी मन्यार :-
हा साप अतिशय दुर्मीळ असून गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा या भागात आढळून येतो हा साप अतिशय शांत असून निशाचर आहे. हा साप रात्री प्रवास करीत असल्याने दंशाच्या घटना कमी दिसून येतात. या सापाचे विष नेरोटॉक्सिक असून मानवाच्या मज्जासंस्थेवर परिणाम करते.

6) चापडा :-
दंशाच्या जागी काही मिनिटांत जळजळ होऊन दुखू लागते. जळजळ अवयवाच्या उगमापर्यंत पसरते. लवकरच जखमेजवळ सूज येते. अवयव लाल होतो. रक्त पातळ होऊन उशिरा गोठते.

7) पोवळा :-
दंश झालेल्या जागी जळजळ होऊन सूज येते. श्वास घेणे अवघड होते. (या सापाचे दंशाचे प्रमाण खूपच कमी असल्यामुळे लक्षणांच्या नोंदी उपलब्ध नाहीत)