
>> वैद्य सत्यव्रत नानल
नवीन वर्ष सुरू झाले की, अनेकांकडून वजन कमी करण्याचे संकल्प केले जातात. महागडय़ा व्यायामशाळांचे सदस्यत्व घेतले जाते. दोन–चार महिने उत्साहाची लाट राहते आणि मग उन्हाळा वाढू लागल्यावर संकल्प, ध्येय वगैरे विरळ होत जाऊन वजन कमी करणे थांबते आणि नकळत वजन वाढीस पोषक सर्व पुन्हा सुरू होते. आजच्या लेखात वजन कमी करण्यासाठी सकाळी उठल्यापासून ते नाष्टय़ापर्यंतचे करायचे उपाय जाणून घेऊया.
व्यायाम करायचा कंटाळा असतो तेसुद्धा वजन वाढू नये म्हणून खाण्यापिण्यातून काही महिने वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात, त्यांचेही पुढे हळूहळू ताबा सुटून वजन वाढतेच. खूप कमी लोक सातत्याने सर्व करून वजन कमीही करतात आणि टिकवूनही ठेवतात.
आपण करत असलेल्या वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत अधिक फायदा कसा मिळेल, जेणेकरून आपला हुरूप लांबपर्यंत टिकून आपण आपले ध्येय जास्तीत जास्त चांगल्या रीतीने पूर्ण करू शकाल, यासाठी आहारातील काही उपाय सांगतो आहे. यातील शक्य तेवढे सर्व उपाय नियमित करावेत आणि फायदा करून घ्यावा.
सकाळी न्याहारीमध्ये सुरुवातीला एक फळ खावे आणि उरलेल्या भुकेचा नाश्ता करावा हा नियम कायम ठेवावा. उरलेल्या नाश्त्याला काय खावे, तर त्यात चण्याच्या पिठाचे दोन घावने/धिर्डे, एक वाटी उपमा, एक पातळ थालीपीठ, कमी आंबवलेल्या पिठाची इडली छोटे दोन नग आणि चटणी, मूग आणि तांदळाच्या पिठाचे दोन-तीन पातळ डोसे यांपैकी एक प्रकार घ्यावा. वेगवेगळय़ा भाज्यांचे सूप बनवावे आणि त्यासह एखादी स्लाइस मल्टी ग्रेन ब्रेडची टोस्ट करून घ्यावी. नॉनव्हेज खाणाऱयांनी याच सूपमध्ये चिकन किंवा मटण घालून शिजवावे आणि खावे किंवा एक किंवा दोन अंडय़ांचा पांढरा बलक हाफ फ्राय करून खावा. सोबत मल्टी ग्रेन ब्रेड स्लाइस दोन घ्याव्यात किंवा फळे आणि ड्रायफूटपैकी दोन काजू, एक अक्रोड, पाच भिजवलेले बदाम, एक भिजवलेला खजूर, पाच भिजवलेल्या काळय़ा मनुका, एक जर्दाळू एवढेच खावे किंवा दोन मूठ भरून भाजलेले चणे, मसाले नसलेला खाकरा दोन नग, साळीच्या लाह्या किंवा गहू, ज्वारी, बाजरी, राजगिरा, मका यांच्यापैकी एकाच्या लाह्या खाव्यात
सकाळी उठल्यापासून ते नाष्टय़ापर्यंतचे करायचे उपाय
हळद पूड एक चमचा आणि कोमट पाणी एक कप एकत्र करून सकाळी उठल्यावर पिणे. यानंतर अर्धा तास तरी काहीही खाऊ पिऊ नये. याने शरीरावरील चरबी कमी होते, रक्ताभिसरण सुधारते. रक्त शुद्ध होण्याची प्रक्रियासुद्धा होते. हा उपाय सर्वांसाठी आहे. कफ होणाऱयांना एक चमचा हळद आणि एक चमचा मध घ्यावा. पाणी घेऊ नये.
सकाळी उठल्यापासूनचे तीन तास काहीही न खाता राहिल्यास वजन अतिशय चांगले कमी होते. सवय नसेल तर हळूहळू निर्माण करावी. (एकदम सुरू केल्यास थकवा, चक्कर, बेचैनी वगैरे अनेक त्रास होतात.) मधे मधे लागले तर गरम गरम पाणी घोट घोट प्यावे. शरीर लगेच हलके होते. वजन कमी होते. पोटाचा घेरही लगेच कमी होतो.
वजन कमी करण्यासाठी पाण्याचे प्रमाण कसे असावे?
शक्यतो गरम किंवा साधे पाणी प्यावे. चहा आणि कॉफी दुधाची न करता जास्त पाण्याची करावी. त्यात दूध घालून उकळू नये. दूध नंतर वरून मिसळावे. चहा, कॉफीमध्ये साखर, गूळ काहीही घालू नये. चहा उकळून त्याचा काढा करू नये. एक मिनिट उकळावे नंतर झाकण ठेवून दोन मिनिटे थांबावे. कडक चहा मिळतो, तो गाळून त्यात थोडे दूध वरून घाला. हर्बल–टी घेत असाल तर त्याचा प्रकार आपल्या वैद्यांना विचारून घ्यावा.
बाजारातील तयार पदार्थ खाणे थांबवले तर लगेच फायदा होतो आणि दिसतोसुद्धा.
शिळे पदार्थ, बेकरीचे पदार्थ आहारातून पूर्ण बंद करावेत. वजन उतरू लागते.
सर्व काही करूनही वजन कमी होत नसेल तर करायचा हमखास उपाय – कधीही खाताना भुकेच्या मात्रेत दोन घास कमीच खावेत. याने वजन वाढायचे लगेच थांबते. सोबत व्यायाम जोडला तर कमीही होतेच होते.
वरील सर्व उपाय हे सामान्य मनुष्य ते मधुमेही रुग्ण वगैरे सर्वांसाठी चालतात असे आहेत. तरीही आपल्या वैद्यांच्या सल्ल्याने यामध्ये आवश्यक बदल आपल्या रोगाप्रमाणे करून घ्यावेत आणि आपला अधिक चांगला फायदा करून घ्यावा.




























































