हाऊडीनंतर मोदींचे थायलंडमध्ये स्वास्दी मोदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतील ह्युस्टनमध्ये ‘हाऊडी मोदी’ या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित केले होते. त्यानंतर आता बँकॉकच्या थायलंडमध्ये मोदी यांनी ‘स्वास्दी मोदी’ या कार्यक्रमात उपस्थिती दाखवली. यावेळी त्यांनी 370 कलम हटवल्याचा उल्लेख यांनी आपल्या भाषणात केला. तसेच आमच्या सरकारने पाच वर्षांचा कालावधी पूर्ण केला. त्यानंतरही बहुमत मिळवून पुन्हा सत्तेवर आले. अशाप्रकारे 60 वर्षांनंतर पुन्हा बहुमत मिळवणारे पहिले सरकार आमचेच असल्याचे प्रतिपादनही मोदी यांनी यावेळी केले. हिंदुस्थानी वंशाच्या नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. थायलंडबरोबर हिंदुस्थानचे ऐतिहासिक संबंध असल्याचे मोदी म्हणाले.

सावडी म्हणजे अभिवादन करणे. मोदी यांनी आपल्या भाषणात सरकारच्या गेल्या पाच वर्षांतील कामांबद्दलही सांगितले. सरकारने कुठले महत्त्वाचे निर्णय घेतले याबाबत सांगितले. 60 वर्षांनंतर हिंदुस्थानात एखादे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू शकले. त्यानंतरही बहुमताने पुन्हा सत्तेत आलो, असेही मोदी यावेळी म्हणाले. दरम्यान, पंतप्रधानांनी छठपूजेबद्दल हिंदुस्थानवासीयांना शुभेच्छा दिल्या. थायलंडची संस्कृती, खानपान, आर्किटेक्चर यांमध्ये हिंदुस्थानची झलक दिसते असेही ते म्हणाले. थायलंडच्या राजकुमारी थमिचक्रम स्वतः संस्कृत भाषेच्या विद्वान असून हिंदुस्थानने त्यांना ‘पद्मभूषण’ आणि संस्कृत सन्मान केव्हाच प्रदान केल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, गेल्या पाच वर्षांत मला जगभरात अनेक देशांमध्ये जाण्याची संधी मिळाली. या देशांमधील हिंदुस्थानींना भेटण्याचा प्रयत्न केला. आजही तुम्ही इतक्या मोठय़ा संख्येने या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी आलात त्याबद्दल आभारी असल्याचेही मोदी म्हणाले.

हिंदुस्थान हागणदारीमुक्त झाला
महात्मा गांधी यांच्या 150 जयंती दिवशी हिंदुस्थान हागणदारीमुक्त झाला. प्रत्येक घरात शौचालय उभारले गेले. हिंदुस्थानातील प्रत्येक गरीबांचे किचनही धूरमुक्त, प्रदूषणमुक्त झाले. कारण, 8 कोटी घरांमध्ये गेल्या 3 वर्षांत मोफत एलपीजी कनेक्शन दिले असेही मोदी म्हणाले. ‘आयुष्मान भारत’ या योजनेअंतर्गत 50 कोटी हिंदुस्थानींना विमा संरक्षण  दिले. त्यानुसार 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत करण्यात येत आहेत याकडेही मोदी यांनी यावेळी लक्ष वेधले.