
एचपी इंक ने मंगळवारी घोषणा केली की, येत्या वर्षभरात जगभरात 4 ते 6 हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार आहेत. कंपनीचे कामकाज अधिक सुलभ होण्यासाठी आता कंपनीने आर्टिफिशियल इंटेलिजेंसचे धोरण (एआय) स्वीकारण्याचे योजले आहे. न्यू यॉर्क पोस्टने दिलेल्या बातमीनुसार, उत्पादन विकासाला गती देणे, ग्राहकांचे समाधान वाढवणे आणि उत्पादकता सुधारणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. कंपनीने कर्मचारी कपातीची घोषणा केल्यानंतर, कंपनीचे शेअर्स 5.5 टक्क्यांनी घसरले.
कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एनरिक लोरेस यांनी सांगितले की, कपातीचा प्रामुख्याने उत्पादन विकास, अंतर्गत ऑपरेशन्स आणि ग्राहक सेवांवर फार मोठा परीणाम होणार आहे. त्यांनी असेही सांगितले की, या उपक्रमामुळे पुढील तीन वर्षांत कंपनीला अंदाजे $1 अब्जची बचत होण्याची अपेक्षा आहे.
AI-सक्षम संगणकांची मागणी सातत्याने वाढत आहे. 31 ऑक्टोबर रोजी संपलेल्या तिमाहीत, HP च्या एकूण विक्रीत 30% पेक्षा जास्त AI PC चा वाटा होता. डेटा सेंटर्सकडून वाढत्या मागणीमुळे मेमरी चिपच्या किमतीत वाढ झाली आहे. कंपनी या आव्हानाला तोंड देण्यासाठी पावले उचलत आहे, ज्यामध्ये कमी किमतीच्या पुरवठादारांना एकत्रित करणे, मेमरी कॉन्फिगरेशन कमी करणे आणि किंमती वाढवणे समाविष्ट आहे.

























































