
चीनच्या एका टेक कंपनीत एचआर म्हणून कार्यरत असलेल्या व्यक्तीने कंपनीला तब्बल 18 कोटी रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. कंपनीचे पैसे लुबाडण्यासाठी या एचआरने 22 बनावट कर्मचारी बनवले. त्यांच्या नावाने 1.6 कोटी युआन म्हणजेच जवळपास 18 कोटी रुपयांचा कंपनीला चुना लावला, परंतु 8 वर्षांनंतर हा बोगस प्रकार अखेर उघडकीस आला. या फसवणुकीनंतर त्या एचआरला शिक्षा सुनावण्यात आली आहे.
कर्मचाऱ्यांच्या पगारापासून ते सर्व गोष्टींत एचआरने हेराफेरी केली. हा सर्व घोटाळा करणारा एचआर यांग हा चीनमधील शांघाय येथील एका कामगार सेवा कंपनीत कार्यरत होता. यांग हा टेक फर्मच्या कामगार सेवा कंपनीत वेतन देण्याचे काम पाहत असे, परंतु पगाराचे कोणतेही ऑडिट होत नाही, असे समजल्यानंतर त्याने 22 बनावट कर्मचारी बनवले. हा सर्व प्रकार जवळपास 8 वर्षे सुरू होता. तोपर्यंत कंपनीच्या कोणत्याही सदस्याला हा प्रकार समजला नाही.
सन नावाचा एक कर्मचारी दर महिन्याला पगार घेत होता, परंतु त्याला काम करताना कोणीही पाहिले नाही. पगाराच्या नोंदी आणि बँक व्यवहार तपासल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. यांगला याबद्दल विचारले असता. सुरुवातीला त्याने हात झटकले, परंतु सर्व पुरावे समोर आल्यानंतर त्याचा नाईलाज झाला. त्याने अखेर आपली चूक कबूल केली. यानंतर पोलिसांनी यांगला अटक केली. कोर्टात उभे केल्यानंतर यांगला 10 वर्षे 2 महिने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. तसेच त्याला दंडही ठोठावण्यात आला.
            
		





































    
    




















