जेलर -2 मध्ये शाहरुख नाही तर हृतिकची एंट्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या बहुप्रतीक्षित ‘जेलर २’ चित्रपटाबाबत नवा अपडेट समोर आला आहे. चित्रपटात एका मोठ्या बॉलिवूड स्टारचा कॅमिओ असणार असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती. सुरुवातीला ही भूमिका बाॅलिवुडचा बादशहा शाहरूख खान साकारणार असल्याचे वृत्त होते. मात्र आता त्यांची जागा हृतिक रोशन घेणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या कुलीनंतर रजनीकांत आता ‘जेलर 2’च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. दिग्दर्शक नेल्सन दिलीपकुमार यांच्या या चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण पूर्ण झाले असून सध्या पोस्ट-प्रॉडक्शनचे काम सुरू आहे. चित्रपटातील एका महत्त्वाच्या दृश्यासाठी मोठ्या स्टारच्या कॅमिओची आवश्यकता आहे. यासाठी अनेक आघाडीच्या कलाकारांशी संपर्क साधण्यात आला होता. काही काळापूर्वी शाहरुख खान यांनी या भूमिकेसाठी होकार दिल्याची चर्चा होती. मात्र नंतर त्यांनी हा कॅमिओ न करण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले. आता निर्मात्यांनी हृतिक रोशन यांच्याशी संपर्क साधल्याची माहिती समोर आली आहे. सध्या दोन्ही बाजूंमध्ये चर्चा सुरू असून हृतिककडून अद्याप अधिकृत होकार मिळालेला नाही. त्यामुळे त्यांच्या सहभागाबाबत कोणतीही अंतिम घोषणा करण्यात आलेली नाही. असे वृत्त टीव्ही 9 ने दिले आहे.

सन पिचर्स निर्मित ‘जेलर 2’ची प्रदर्शन तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नसली, तरी चित्रपटाविषयीची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. आता हृतिक रोशन खरोखरच या चित्रपटाचा भाग बनतोय का याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.