
उज्जैनच्या जगप्रसिद्ध महाकालेश्वर मंदिराच्या नावाने करण्यात आलेली एक जाहिरात वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. Zomato या फूड डिलिव्हरी कंपनीची ही जाहिरात आहे. या जाहिरातीत बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशनने डायलॉग मारला आहे. या डायलॉगवरून हा गोंधळ उडाला आहे. हृतिक म्हणत आहे की, मी उज्जैन मध्ये आहे मला भूक लागली होती, म्हणून मी महाकालकडे थाळी मागितली. यावर महाकाल मंदिराच्या पुजाऱ्यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. Zomato कंपनी आणि हृतिक रोशन संभ्रम पसरवत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महाकाल मंदिरातील थाळी भाविकांना मोफत दिली जाते. तीची कुठेही डिलिव्हरी दिली जात नाही. त्यामुळे पुजाऱ्यांनी Zomato आणि हृतिकला माफी मागण्यास सांगितले आहे. तसेच उज्जैनच्या जिल्हाधिकाऱ्यांनीही या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
महाकाल मंदिरातील अशी कोणतीही थाळी उज्जैनमध्ये किंवा देशात पोहोचवली जात नसल्याचे पुजाऱ्यांचे म्हणणे आहे. ही थाळी केवळ मंदिरासमोरील परिसरातच भाविकांना मोफत दिली जाते, असे पुजाऱ्यांचे म्हणणे आहे. या जाहिरातीमुळे भाविकांचा भ्रमनिरास होत आहे. मांसाहारी जेवण डिलिव्हरी करणाऱ्या कंपनीने स्वत:च्या फायद्यासाठी महाकाल मंदिराचे नाव घेऊन समाजात संभ्रम पसरवला आहे. याचा विचार कंपनीने आधीच करायला हवा होता. तसेच पुजारी म्हणाले की, हिंदू समाज सहिष्णुता दाखवतो. इतर धर्माबाबत अशी जाहिरात केली असती तर मोठा गदारोळ झाला असता.
या प्रकरणाबाबत उज्जैनचे जिल्हाधिकारी आशिष सिंह म्हणाले की, ही जाहिरात दिशाभूल करणारी आणि तथ्यहीन आहे. महाकाल मंदिराच्या आतच भाविकांना प्रसाद घेता येतो. इथून थाळी कुठेही डिलिव्हरी केली जात नाही. या प्रकरणाची चौकशी करून ही जाहिरात बंद करण्यासाठी प्रशासन कारवाई करेल. महाकाल मंदिरात दररोज हजारो भाविक प्रसाद घेण्यासाठी येतात. ते मंदिर समितीतर्फे मोफत दिले जाते. समितीतर्फे सकाळी 11 ते 2 आणि सायंकाळी 5 ते 8 या वेळेत भाविकांना प्रसाद देण्यात येतो. गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा येथे सुरू आहे.




























































