
राज्यात इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा ऑफलाइन घेण्यात येतील अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज विधानसभेत दिली. या परीक्षांच्या संदर्भात सुधीर मुनगंटीवार यांनी मुद्दा उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, दहावी व बारावीच्या परीक्षा हा महत्त्वाचा विषय असून शिक्षण विभागामार्फत याबाबत विविध मुद्दय़ांवर चर्चा केली जात आहे. त्यानुसार या दोन्ही परीक्षा ऑफलाइन घेण्यात येतील.
दहावीचे 16 लाख तर बारावीला 15 लाख विद्यार्थी आहेत. कोरोनामुळे गेल्या वर्षीचे शैक्षणीक वर्ष अडचणीचे गेले आहे. अद्यापही राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे परीक्षा घेताना विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राथमिकता दिली जाईल. दूरदर्शनच्या ‘सह्याद्री’ वाहिनीच्या माध्यमातून 15 मार्चपासून विविध विषयांसंदर्भात माहिती पोहचविण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. अन्य मंडळांच्या परीक्षांच्या तारखा पाहूनच वेळापत्रक केल्याचेही गायकवाड यांनी सांगितले.
























































