
सामना प्रतिनिधी, आष्टी
आष्टी तालुक्यातील धानोरा येथे सध्या बारावीच्या परीक्षा सुरू असून या ठिकाणी दोन परीक्षा केंद्रे आहेत. येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात परीक्षा देण्यासाठी परिसरातील गावचे विद्यार्थी व विद्यार्थिनी येत आहेत. परीक्षार्थी विद्यार्थिनींना उडाणटप्पू रोडरोमिओंकडून त्रास होत असल्याने याचा परिणाम विद्यार्थिनींच्या मानसिकते बरोबरच बारावीच्या परीक्षेवर दिसून येत आहे.
या प्रकारांमुळे “बेटी बचाओ, बेटी पढाओ” ब्रीदवाक्य फक्त कागदावरच का? पोलीस रोडरोमिओचा बंदोबस्त करणार का? असा संतप्त सवाल धानोरा चिंचोली, साबलखेड, हिवरा, पिंपरखेड, कुंभारवाडी, सुलेमान देवळा, भोजेवाडी, वाघळूज, नांदूर, बाळेवाडी, कुंबेफळ, खुंटेफळ, पुंडी, शिरापूर, मेहकरी व परिसरातील पालकातून होत आहे. धानोरा येथे शिक्षणासाठी बाहेर गावच्या विद्यार्थिनींची संख्या जास्त आहे. धानोरा बसस्थानक ते दोन्ही महाविद्यालये लांब अंतरावर असल्याने बसस्थानक, हिवरारोड, जनता उच्च माध्यमिक विद्यालय तसेच कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय परिसरात रोडरोमिओंकडून बाईकवर ट्रिपलसीट येऊन कर्णकर्कश हॉर्न वाजविणे, शिट्टी वाजविणे, अश्लील हावभाव करणे, मुलींची छेड काढणे असे अनेक प्रकार होत आहेत. त्यामुळे अनेक महाविद्यालयीन तरुणींनी महाविद्यालयीन शिक्षणाला मध्येच सोडून दिले आहे.
पोलीस अधीक्षकांनी महिला व मुलीची छेडछाड होऊ नये म्हणून प्रत्येक तालुक्यात दामिनी पथक नियुक्त केले आहे. परंतु हे दामिनी पथक धानोरा येथे येऊन कारवाई का करत नाही? या रोडरोमिओंना पोलिसांनी वेळीच लगाम घातला नाही तर मुलींचे शिक्षण घेणे बंद करावे लागेल, अशा प्रतिक्रिया पालकातून व्यक्त होत आहेत.






























































