
संपूर्ण देशात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज लाखोंच्या घरात कोरोनाचे रुग्ण आढळत आहे. असे असताना उत्तराखंडमध्ये कुंभ मेळ्यासाठी गंगा नदीच्या किनारी लाखो भाविकांनी हजेरी लावली आहे. शाही स्नानासाठी भाविक, साधु संतांनी एकच गर्दी केली असून तिथे कोरोनाच्या नियमांना बगल देण्यात आली आहे.
आज 12 एप्रिल रोजी शाही स्नान आहे. आदल्या दिवशी गंगेत आंघोळ करणे शुभ मानले जाते. आरोग्य मंत्रालयाने नियम जारी केल्यानंतरही भाविकांनी गंगा किनारी एकच गर्दी केली.
सोमवारी शाही स्नानमध्ये लाखो भाविकांसोबत 13 आखाड्याचे प्रतिनिधीत्व करणारे अनेक साधु संत गंगा नदीत आंघोळ करणार आहेत. कोरोनामुळे कुंभ मेळ्याचा अवधी कमी करण्यात आला होता. यंदा कुंभमेळा 1 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत असणार आहे. कोरोना काळात कुंभमेळ्यात सर्व प्रकाराची काळजी घेण्यात येत आहे. उत्तराखंड उच्च न्यायालयाने भाविकांना कोविड लसीकरण आणि कोरोना निगेटिव्ह रीपोर्ट अनिवार्य केले होते.
तर रविवारी हरिद्वारमध्ये गेल्या 24 तासात 386 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. शहरात सध्या सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 2 हजार 56 इतकी आहे. यापूर्वी 4 एप्रिल रोजी शहरात 173 रुग्ण आढळले होते. तेव्हा सक्रिय रुग्णांची संख्या 837 इतकी होती. कोरोनामुळे 13 साधू आखाड्यासाठी वेगवेगळे मार्ग बनवण्यात आले आहे. मेळ्यात भाविकांना घाटावर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.




























































