
सामना प्रतिनिधी। सेलू
रुग्णांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात नेण्यासाठी सोयीस्कर असलेल्या सेलू-निपाणी टाकळी या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम त्वरीत सुरु करावे, अन्यथा १ जुलै पासून बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा समाज कार्य करणाऱ्या संघटनांनी एका निवेदनाद्वारे उपजिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.
सेलू ते निपाणी टाकळी हा रस्ता ४ कि.मी.चा असून या रस्त्यावरून सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात लवकर जाता येते. पण गेल्या २ वर्षापासून या रस्त्याचे काम अर्धवट असून हा रस्ता वाहतुकीसाठी अडचणीचा ठरत आहे. उपजिल्हा रुग्णालयातील अत्यवस्थ रुग्णांना परभणीला हलविण्यासाठी हा अत्यंत जवळचा मार्ग आहे. कारण हाच रस्ता पुढे सेलू-परभणी टाकळी पाटीजवळ मिळतो. पण हा रस्ता खराब असल्यामुळे अत्यवस्थ रुग्णांना रुग्णवाहिकेतून नेण्यासाठी संपूर्ण सेलू शहराला वळसा घालून जावे लागते. अशावेळी शहरातून जाताना रुग्णवाहिकेला वाहतुकीचा अडथळा होत असल्यामुळे परभणी येथे पोहचण्यासाठी विलंब होतो. यामुळे बऱ्याच वेळा उपचारासाठी विलंब झाल्यामुळे अत्यवस्थ रुग्ण वाटेतच दगावल्याची उदाहरणे आहेत. यासाठी सेलू-निपाणी टाकळी हा रस्ता जर त्वरीत दुरुस्त झाला तर रुग्णांची होणारी गैरसोय मोठ्या प्रमाणात टळणार आहे. यामुळे येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी १ जुलै पासून बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.

































































