हरणाची शिकार करून शिकारी फरार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंगोली तालुक्यातील जामठी शिवारात वन्यप्राण्यांची शिकार करणारे टोळके वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी आल्याचे पाहून पळुन गेले. मात्र, हरणाची केलेली शिकार व अवशेष मात्र वनविभागाच्या हाती लागले आहेत. याप्रकरणी घटनास्थळी पंचनामा करण्याचे काम सुरु असल्याची माहिती हिंगोलीचे वन परिक्षेत्र अधिकारी व्ही.बी. टाक यांनी दिली.

हिंगोली तालुक्यातील साटंबा, जामठी या परिसरात डोंगराळ भाग असून वनजमिन आहे. या वन क्षेत्रामध्ये हरीण, निलगाय यासह अन्य वन्यप्राणी मोठ्या प्रमाणावर संचार करतात. एका टोळक्याने हरणाची शिकार करुन धारदार शस्त्राने हरीणाचे मुंडके धडापासुन वेगळे केले. तसेच पायही कापुन टाकले. दरम्यान, ही माहिती समजल्यावर वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळाकडे रवाना झाले. त्यांची चाहूल लागताच शिकारी टोळके फरार होण्यात यशस्वी झाले. मात्र, हरणाचे मांस  व अवशेष तसेच इतर साहित्य वन विभागाच्या हाती लागले असून पंचनामा करण्याचे काम सुरु असल्याचे वन परिक्षेत्र अधिकारी टाक यांनी सांगितले आहे. घटनास्थळी मोटारसायकलही आढळून आली असून त्या आधारावर तपास केला जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. पंचनाम्याचे व वन्यप्राण्याच्या शवविच्छेदनाचे काम पूर्ण झाल्यावर वन विभागाकडुन गुन्ह्याची नोंद केली जाणार असल्याचेही सुत्रांनी सांगितले. तर वन्यप्राण्याची शिकार करणाऱ्या टोळक्याला शोधून काढले जाईल, असे हिंगोलीचे विभागीय वन अधिकारी केशव वाबळे यांनी सांगितले.