
पतीने पत्नीचा नाक आणि तोंड दाबून खून केल्याची घटना राजापूर तालुक्यातील परूळे गावात घडली आहे. खुनानंतर पोलिसांना गुंगारा देण्यासाठी पतीने बनाव रचला होता, मात्र पोलिस तपासात पतीने खून केल्याचे उघड झाले.
या प्रकरणातील पतीने पत्नी सिध्दी उर्फ विद्या गजानन भोवड (वय 35) हिचे नाक व तोंड दाबून खून केल्याची घटना तालुक्यातील परुळे येथे शुक्रवारी घडली. पत्नीच्या हत्येनंतर तिचा आरोपी असलेला पती गजानन जगन्नाथ भोवड (वय 40) याने बनाव करताना अज्ञात व्यक्तीने आपल्या पत्नीला ओढीत नेले व तिचा खून केल्याचे भासवत पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. मात्र चाणाक्ष पोलिसानी तो हाणून पाडला आणि अखेर पत्नीचा खुन आपणच केल्याची कबुली आरोपीने दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील परुळे येथील सुतारवाडीत भोवड कुटुंबीय सामायिक घरात रहातात. त्यामध्ये एका भागात आरोपी गजानन, दुसऱ्या भागात आरोपीचे आईवडील व भाउ आणि तिसऱ्या भागात आरोपीच्या चुलतीचे कुटुंब रहाते. आरोपीचा भाऊही कळव्याला राहतो. आरोपी गजानन हा त्याची पत्नी सिध्दी उर्फ विद्या व आठ वर्षीय मुलगा यांच्या समवेत कळवा (ठाणे ) येथे रहात होता. तो परुळे येथे एका प्रिंटींग प्रेसमध्ये लॅमिनेशन ऑपरेटर म्हणून कामाला होता. एप्रिलमध्ये लागलेल्या लॉकडाउन मध्ये गजाननची नोकरी गेल्याने नंतर तो पत्नी व मुलासह दिनांक 29 मे 2021 रोजी आपल्या परुळे गावी आला होता. गेले काही दिवस ते गावीच होते.
मयत सिध्दी उर्फ विद्या हिची बहिण परुळे येथे राहत होती. काही दिवसांपूर्वी तिच्या बहिणीचे मूल पोटातच दगावल्याने बहिणीला बघण्यासाठी ती दोन वेळा तिच्या घरी गेली होती. शुक्रवारी दुपारी दोघे पती पत्नी पुन्हा सिध्दीच्या बहिणीला भेटण्यासाठी निघाले होते. वाटेत असलेला वहाळ पार करुन दोघे बाजूला असलेल्या अज्ञात जंगलातुन चालले असता पती गजानने अचानक सिध्दीचे नाक व तोंड दाबून धरले. त्यामध्ये तिचा जागीच मृत्यु झाला होता.
विद्या मृत झाल्याचे लक्षात येताच गजानन घरी आला व आजुबाजुच्या मंडळींशी बोलताना त्याने बनाव केला आपण पत्नी समवेत चाललो असता समोरुन एक पांढऱ्या चेहऱ्याचा राकट व विचित्र चेहऱ्याची एक व्यक्ती आली त्या व्यक्तिने मला ढकलुन दिले व पत्नीला उचलून तो जंगलात निघून गेला. तेव्हा आपली शुद्ध हरपली होती. मात्र त्यातून सावरल्यावर आपण घरी आलो, असे त्याने खोटेच सांगितले.
त्यानंतर तेथे उपस्थित असलेले अनेक ग्रामस्थ विद्याचा शोध घेत जंगलच्या दिशेने निघाले. तेथे आजुबाजुला शोध घेत असता सिद्धी मृतावस्थेत आढळून आली. त्या घटनेची खबर परुळे गावचे पोलीस पाटील विलास कस्पले यांना देण्यात आली. मात्र ते होम आयसोलेशन मध्ये असल्याने त्यानी रायपाटण पोलिसांना झाल्याप्रकाराची माहिती दिली.
मयत सिध्दीचा मृतदेह रायपाटण ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. शुक्रवारी रात्री अकरा वाजल्यापासून सिध्दीचा पती गजानन याची पोलीस कसून चौकशी करीत होते मात्र पोलिसांना तपासात तो गुंगारा देत होता. कुणा अज्ञात व्यक्तिने तिला ओढीत नेले व नंतर ती मृत पावली असेच तो सांगत होता. पोलिसांनी त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार सुरुच ठेवला होता. पोलिसांच्या तपासात पूर्णपणे फसलेल्या गजाननने अखेर शरणागती पत्करली आणि पत्नी सिध्दीचा खून आपणच केल्याची पोलिसांकडे कबुली दिली.
आपली पत्नी सिद्धी ही शिवीगाळ करायची, त्रास द्यायची. त्यामुळे तिचा खुन केल्याची कबुली गजानन याने दिली. खुनानंतर काही तासातच पोलिसांनी खुनाचा यशस्वी छडा लावला होता आरोपी गजाननने खुन केल्याची कबुली दिल्यानंतर त्याच्या विरुध्द भादवि कलम 302, 201 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली आहे. अत्यंत गुंतागुंतीच्या या प्रकरणात सिध्दीच्या खुनामागे आणखी काही कारणे आहेत का, याचा तपास राजापुर पोलीस करीत आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा तपास राजापुरचे पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर करीत आहेत. या झालेल्या खुनामुळे परुळेमध्ये खळबळ उडाली आहे.






























































