
कोल्हापूरमध्ये एका महिलेला तिच्या मुलीसह विलगीकरण कक्षात ठेवले. त्यामुळे तिने विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. हे कळताच तिच्या पतीनेही गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
काकासो शांताराम बोटे यांची पत्नी आणि लहान मुलगी हे लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे इंचलकरंजी येथे नातेवाईकांच्या घरी अडकले होते. दोन दिवसांपूर्वी या दोघी गावी परत आल्यानंतर ग्रामसमितीने या दोघींनाही शाळेत विलगीकरण कक्षात ठेवले होते. यावरुन पती-पत्नी मध्ये वादही झाला होता. घरी जाता येत नसल्याने, तसेच शाळेत चौदा दिवस रहावे लागणार म्हणुन काल पत्नीने विषारी औषध प्राशन केले. तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. रात्री उशिरापर्यंत ग्रामस्थांकडुन काकासो बोटे याची समजुत काढण्याचा प्रयत्न सुरू होता. पण मंगळवारी सकाळीच बोटे याने गावातील जंगल परिसरात एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला. ग्रामसमितीचे अध्यक्ष आणि सरपंच दिग्विजय पाटील यांनीही या घटनेला दुजोरा दिला. याप्रकरणी मुरगुड पोलिस ठाण्यात काकासो बोटे याचा दारुच्या नशेत झाडाला गळफास लावून मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.






























































