
विभक्त राहू लागलेल्या पत्नीला घरभाडे देणे म्हणजे तिला न्याय मिळाला, असे म्हणता येणार नाही. संसार करताना जर पत्नीशी पटत नसेल तर पतीनेही दुसरीकडे भाड्याच्या घरात राहायला काय हरकत आहे, असे महत्त्वपूर्ण मत दिंडोशीतील सत्र न्यायालयाने एका प्रकरणात नोंदवले. सामाईक घरावर पती-पत्नी दोघांचाही कायदेशीर हक्क असल्याचे न्यायालय म्हणाले.
45 वर्षीय महिलेने तिचा पती सामाईक घरात राहायला देत नाही, असा आरोप करीत दिंडोशी सत्र न्यायालयात दाद मागितली. तिच्या याचिकेवर न्यायदंडाधिकाऱ्य़ांनी निर्णय दिला होता. त्या निर्णयाला तिने सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. यू. बघेले यांनी नुकताच निकाल दिला. या प्रकरणात पत्नीने हल्ला केल्याच्या कारणावरून तिला घरात प्रवेश नाकारला जात आहे. मात्र या एका कारणावरून पत्नीला सामाईक घरामध्ये प्रवेश करण्यास रोखले जाऊ शकत नाही, असे निरीक्षण अतिरिक्त सत्र न्यायाधीश बघेले यांनी निर्णय देताना नोंदवले. तसेच याचिकाकर्त्या महिलेला सामाईक घरामध्ये प्रवेश देण्याचा आदेश पतीला दिला.
महिलेचा आरोप काय?
तक्रारदार महिलेने पतीविरोधात कौटुंबिक छळाची तक्रार दाखल केली होती. पतीने मला घराबाहेर काढले. माझ्या दोन लहान मुलांना भेटू दिले जात नाही. याप्रकरणी मला पोटगी मंजूर करण्याबरोबरच घरामध्ये राहण्यास परवानगी द्या, अशी विनंती महिलेने केली होती. तिच्या याचिकेवर न्यायदंडाधिकाऱ्य़ांनी तिला दरमहा 2 हजारांची पोटगी आणि 5 हजारांचे घरभाडे मंजूर केले होते. मात्र तिला सामाईक घरामध्ये राहण्यास परवानगी नाकारली होती.
न्यायालय म्हणाले…
पती-पत्नीमध्ये खटके उडाल्यानंतर घर सोडून गेलेल्या पत्नीला स्वतंत्र राहण्यासाठी घरभाडे दिले जात असेल तर पती स्वतःच घर सोडून स्वतंत्र ठिकाणी भाड्याने राहायला का जाऊ शकत नाही. केवळ महिलेला घराबाहेर स्वतंत्र राहण्यासाठी घरभाड्याची रक्कम देणे म्हणजे न्याय नव्हे.- एस. यू. बघेले, अतिरिक्त सत्र न्यायाधीश






























































