
उत्तर प्रदेशातील अलीगडमधील एका नवऱ्याने बायकोला तलाक देण्याची तयारी पूर्ण केली आहे. तलाकसाठी त्याने दिलेलं कारण ज्यांनी ऐकलंय त्या सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. महिलेने हे प्रकरण महिला संरक्षण कक्षाकडे नेलं आहे. तूर्तास या दोघांचे समुपदेशन सुरू असून दोघांमधील वाद संपुष्टात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. समुपदेशनादरम्यान नवऱ्याने त्याला होणाऱ्या त्रासाबद्दल मनमोकळेपणाने सांगितलं. ‘माझी बायको आंघोळ करत नाहीये, मी तिच्यासोबत राहू शकत नाही, मला प्लीज तलाक द्या.’
अलीगडमधील चंडौसमध्ये राहणाऱ्या तरुणाचा निकाह क्वार्सी इथल्या तरुणीशी झाला होता. सुरुवातीचे काही दिवस चांगले गेले, मात्र नंतर दोघांत वादाला सुरुवात झाली. भांडणांदरम्यान दोघांनी एकमेकांच्या राहणीमानावरून टोमणे मारायला सुरुवात केली. 9 महिन्यांपूर्वी या दाम्पत्याला मूल झालं, मूल झाल्यानंतरही दोघांतील वाद थांबले नाहीत. वाढत्या वादामुळे महिलेने महिला संरक्षण विभागाकडे तक्रार केली. यानंतर दोघांचं समुपदेशन करण्यासाठी त्यांना समुपदेशकाकडे पाठवण्यात आलं. समुपदेशकाशी बोलत असताना नवऱ्याने सांगितलं की तो त्याच्या बायकोच्या आंघोळ न करण्याच्या सवयीमुळे त्रस्त आहे. आपली बायको रोज आंघोळ करत नसून तिच्या अंगाला घाणेरडा वास येत असल्याचं नवऱ्याने सांगितलं आहे. या कारणामुळेच आपल्याला तिच्यासोबत राहायचं नसल्याचं नवऱ्याने समुपदेशकाला सांगितलं आहे. बायकोने मात्र हे आरोप खोटे असून आपल्याला त्रास देण्यासाठी नवऱ्याने रचलेले कुभांड असल्याचा दावा केला आहे.




























































