
सोलापूर ते पुणे रेल्केमार्गावरील भाळवणी ते भिगवण या 55 किलोमीटरच्या दुहेरीकरणाचे काम सुरू असल्याने ‘हुतात्मा एक्सप्रेस’ 1 ते 16 सप्टेंबरपर्यंत रद्द करण्यात आली होती. मात्र, काम पूर्ण झाले नसल्याने पुन्हा 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरदरम्यान ‘हुतात्मा एक्सप्रेस’ रद्द करण्यात आली असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
सोलापूर विभागात दुहेरीकणाचे काम 2010पासून सुरू आहे. हे काम रेल्वे प्रशासनाने ‘रेल विकास निगम लिमिटेड’ (आरव्हीएनएल) यांना दिले आहे. त्यामुळे विभागातील भाळवणी ते भिगवण या 55 किलोमीटरच्या कामासाठी सोलापूरकरांची जीवनवाहिनी समजली जाणारी सोलापूर-पुणे-सोलापूर हुतात्मा एक्सप्रेस बंद आहे. भाळवणी ते भिगवण यादरम्यान दुहेरीकरणाबरोबर विद्युतीकरणाचे काम इंजिनीअरिंग ब्लॉक घेऊन केले जात असल्याची माहिती ‘आरव्हीएनएल’च्या अधिकाऱयांनी दिली.
भाळवणी व भिगवणदरम्यान सुरू असलेल्या कामाच्या देखभाल-दुरुस्तीचे काम प्रगतिपथावर असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे. हुतात्मा एक्सप्रेसने पुण्याकडे जाण्यासाठी सोलापूरकरांची प्रचंड गर्दी होत असते. सतत गाडी रद्द होत असल्याने सोलापूरकरांची प्रचंड गैरसोय होत आहे. मात्र, एक संपूर्ण रेल्वे रद्द होत असल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. त्यामुळे कोईम्बतूर-कुर्ला-एलएलटी एक्सप्रेस ही गाडी सकाळी 6 वाजता असल्याने या गाडीवर प्रवाशांचा भार येणार आहे. या गाडीचे आरक्षित तिकीट वेंटिंगचे आणि तिकीटदर जास्त असल्याने ही गाडी सोलापूरकरांना परवडणारी नाही.
हुतात्मा एक्सप्रेस रद्द करण्यात येत असल्यामुळे चाकरमानी, विद्यार्थी, उद्योजक, शेतकरी यांना खासगी वाहनांचा आधार घेत प्रवास करावा लागत आहे. खासगी वाहनाने प्रवास करावा लागत असल्याने पैसेदेखील जास्त लागत आहेत. त्यामुळे ‘हुतात्मा एक्सप्रेस’ केव्हा सुरू होणार, याचीच सोलापूरकरांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने हुतात्मा एक्सप्रेस लवकरात लवकर सुरू करावी.
– संजय पाटील, अध्यक्ष, सोलापूर रेल्वे प्रवासी संघ.
दुहेरीकरणाच्या कामासाठी इंजिनीअरिंग ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे हुतात्मा एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. दुहेरीकरणाचे आणि विद्युतीकरणाचे काम सुरू होताच गाडी सुरू करण्यात येईल.
-प्रदीप हिरडे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर रेल्वे.




























































