
तेलंगणामध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. पतीने पत्नीवर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळल्याची घटना हैदराबादच्या नल्लकुंटा येथे घडली आहे. शिवाय आईला वाचवायला आलेल्या मुलीलाही त्याने आगीत ढकलले. त्यानंतर घरातून तो फरार झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेत आहेत.
वेंकटेश असे आरोपीचे नाव आहे. वेंकटेश आणि त्रिवेणी यांचा प्रेमविवाह झाला होता. मात्र, लग्नाचे काही वर्षे गुण्यागोविंदाने राहिल्यानंतर वेंकटेश त्रिवेणीच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. त्याचा संशय एवढा बळावला की काहीवेळेला तो तिला मारहाणही करायचा. त्याच्या या वागण्याला त्रिवेणी त्रासली होती. त्यासाठी ती माहेरी जाऊन राहिलीही होती. मात्र नंतर ती परतली होती. पुन्हा तो तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायला लागला. यावरून दोघांमध्ये कायम वाद होत होता. मागच्या दिवसांमध्ये वाद इतका वाढला होता की, वेंकटेश याचा पारा सुटला आणि त्याने आपल्या दोन चिमुकल्या मुलांसमोर पत्नीवर पेट्रोल टाकून जीवंत जाळले. त्रिवेणी आगीत होरपळत होती. तिच्या मुलीने आईला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला आपल्या मुलीचीही दया आली नाही आणि त्याने त्या चिमुकलीलाही आगीत ढकलले. त्यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला. यात त्रिवेणीचा मृत्यू झाला. कसातरी आपला जीव वाचवत मुलगी आगीतून बाहेर पडली. तिला बऱ्याच जखमा झाल्या आहेत. पण आईचा मृत्यू आणि वडिलांच्या कृत्याने तिला मोठा हादरा बसला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

























































